खाडीपाड्यावरील ख्रिश्चन धर्मप्रसार रोखण्याची आदिवासींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 03:47 AM2019-02-04T03:47:57+5:302019-02-04T03:48:13+5:30
चिखले ग्रामपंचयाती अंतर्गत खाडीपाडा या आदिवासी पाड्यावर चालणाऱ्या ख्रिश्चन धर्मप्रसाराला बंदी घालण्याकरिता विशेष ग्रामसभेची मागणी स्थानिकांनी केली आहे.
डहाणू - चिखले ग्रामपंचयाती अंतर्गत खाडीपाडा या आदिवासी पाड्यावर चालणाऱ्या ख्रिश्चन धर्मप्रसाराला बंदी घालण्याकरिता विशेष ग्रामसभेची मागणी स्थानिकांनी केली आहे. दरम्यान संविधानाबद्दलची माहिती देणारे वादग्रस्त फलकाचा ठराव रद्द करणे हा अन्य विषय आहे. त्यामुळे सोमवारी होणारी ग्रामसभा चर्चेचा विषय ठरली आहे.
या ग्रामपंचायतीतील खाडीपाडा येथे एक ग्रामस्थ ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याकरिता येथील आदिवासिंवर जबरदस्ती करीत असून त्याकरिता प्रलोभनं देत असल्याचा मुद्दा स्थानिकांनी उपस्थित केला आहे. तेथे या धर्माचे समाजमंदिर उभारले असून दर सोमवारी शेकडो लोकांचा जमाव एकवटतो. त्यामुळे आदिवासी आणि हिंदू धर्मियांच्या देवदेवतांची विटंबना होत असल्याचे अर्जात म्हटले आहे. तर शेवटच्या मुद्यात या ग्रामपंचायतीच्या १ मे २०१७ च्या ग्रामसभेतील ठराव क्र मांक ५/३ अन्वये भारतीय संविधान अन्वये अनुच्छेद १३(३) क नुसार दाखला देत, ख्रिश्चन धर्म प्रसारास बंदी घालण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे.
दरम्यान या फलकावर लिहलेले संविधानातील काही मुद्दे चुकीचे ठरल्याने हटविण्यात आले आहेत. त्याबाबतचा ठराव रद्द करणे हा विशेष ग्रामसभेचा अन्य मुद्दा आहे. तर धर्म प्रसाराविरोधात फलकावरील मुद्यांचा दाखला अर्जादारांनी दिला आहे.
जिल्ह्याचे वेधले लक्ष
त्यामुळे संविधानाची योग्य माहिती व्हावी म्हणून पोलीस आणि ग्राम प्रशासनाला प्रबोधनाचे कार्य हाती घ्यावे लागणार आहे.
याबाबत ग्रामसभेत कोणता निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.