बँकेच्या कर्जापासून आदिवासी अनभिज्ञ, कर्जमाफीनंतर आदिवासींच्या डोक्यावरील कर्ज झाले उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:32 AM2020-03-15T00:32:36+5:302020-03-15T00:33:04+5:30
बोगस कर्ज कशी वाटप केली जातात आणि त्याचा लाभ अनेक सामाजिक संस्था, बँका व दलाल कसे आपल्या घशात घालून घेतात याचे जिवंत उदाहरण वाडा तालुक्यातील वि-हे येथील शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्जावरून उघड झाले आहे.
- वसंत भोईर
वाडा : तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांना आपण मोठ्या रकमेचे बँकेकडून कर्ज घेतले असल्याबद्दल माहितीच नसून शासनाने केलेल्या कर्जमाफीनंतर त्यांच्या नावे हजारो रुपयांचे कर्ज होते व ते माफ झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे बोगस कर्ज कशी वाटप केली जातात आणि त्याचा लाभ अनेक सामाजिक संस्था, बँका व दलाल कसे आपल्या घशात घालून घेतात याचे जिवंत उदाहरण वाडा तालुक्यातील वि-हे येथील शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्जावरून उघड झाले आहे. यातील फसवल्या गेलेल्या अनेक शेतकऱ्यांनी वाडा तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करत या कर्ज प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
वाडा शहरापासून सुमारे ४० कि.मी. अंतरावरील वि-हे गावातील काही शेतकºयांना एका व्यक्तीने येऊन तुम्हाला कर्जमाफी मिळाली आहे. तुम्ही फॉर्म भरून लाभ घ्या आणि पावती आमच्या कार्यालयात आणून द्या, असे सांगितले. यानंतर येथील वसंत देऊ वातास, देवीदास गौड, सुरेश बोंगे, रमेश लक्ष्मण बोंगे, लखमा लक्ष्मण रिंजड, सोन्या रामू भोये, दामू देऊ बर्डे, बंधू सोनू बरफ या शेतकऱ्यांनी येऊन कर्जमाफीचे फॉर्म भरले असता आपण ३९ हजार तर कुणी ४२ हजार रुपये कर्ज घेतले होते आणि ते माफ झाले असे समजले. बंधू बरफ व वसंत वातास यांनी प्रत्यक्षात एकही रु पयांचे कर्ज घेतले नसून त्यांच्या नावे हजारो रुपयांचे कर्ज घेऊन ते माफ केले आहे असे उघड झाले. शेतकºयांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी सिंजेंटा फाउंडेशनने येथील स्थानिक व्यक्ती भारत लहांगे यांना सोबत घेऊन शेतकºयांकडून एक फार्म भरून घेतला होता तसेच यानंतर काहींकडून धनादेश व कागद सह्या करून घेतले होते. यातील काही शेतकºयांना मोटार व बियाणे यासाठी ८ ते १९ हजार देण्यात आले होते. काहींनी यातील ठराविक रक्कम परत देखील केली तर मागील वर्षी झालेल्या कर्जमाफीत आपली कर्ज माफ झाली असतील असा समज या शेतकऱ्यांचा झाला. नुकताच झालेल्या कर्जमाफीत मात्र याच शेतकºयांच्या नावाने ३९ ते ४२ हजार अशा रक्कमेचे कर्ज काढलेले आहे हे पाहून शेतकरी अचंबित झाले आहेत. आपल्या अशिक्षितपणाचा फायदा घेत सह्या व अंगठे यांचा दुरुपयोग करून शेतकरी व कर्जमाफी करणाऱ्यां सरकारची घोर फसवणूक केल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे.
शासनाच्या आदेशानुसार कर्जमाफी देण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील विºहे येथील शेतकºयांच्या कर्ज घेतलेच नसल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने चौकशी करु न वरिष्ठांच्या सूचनांनुसार कार्यवाही करू.
- डॉ. उद्धव कदम, तहसीलदार, वाडा.
वाडा तालुक्यातील भारत लहांगे याच्या पत्नीच्या नावे औषधे, खते व औजारे देण्यासाठी प्रयत्न केले होते, यात शेतकºयांची फसवणूक करण्यात आली असेल तर आम्हाला काही माहिती नाही. सविस्तर माहिती घेऊन कारवाही करू.
- अविनाश वामन, प्रोजेक्ट आॅफिसर ,सिजेंटा फाउंडेशन