मुंबई पोलीस चौकीतून डहाणूतील आदिवासी खलाशी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:13 PM2019-09-11T23:13:55+5:302019-09-11T23:14:07+5:30

शोध अपयशी : दोन पोलीस ठाण्यातील हद्द गुन्हा नोंदविण्यातील अडसर

Tribal sailor missing in Mumbai Dahanu missing from Mumbai police post | मुंबई पोलीस चौकीतून डहाणूतील आदिवासी खलाशी बेपत्ता

मुंबई पोलीस चौकीतून डहाणूतील आदिवासी खलाशी बेपत्ता

Next

अनिरुद्ध पाटील

बोर्डी : डहाणू तालुक्यातील नारायण लक्ष्मण कडू (४५, रा. कोसबाड) हा आदिवासी खलाशी १ सप्टेंबरच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास भाऊचा धक्का येथील चमार गोदीनजीकच्या पोलीस चौकीतून बाहेर पडला. त्याला दहा दिवस उलटले. मात्र यलो गेट आणि शिवडी पोलीस हे हद्दीच्या प्रश्नावरून तक्रार नोंदवत नसल्याने त्याला शोधण्यात अडथळा येत आहे. हा प्रकार पोलिसांच्या हलगर्जीपणाने झाल्याचा आरोप आदिवासी कुटुंबाने केला आहे. दरम्यान, शोध मोहिमेची जबाबदारी पाड्यावरच्या आदिवासी युवकांनी खांद्यावर घेतली असून अनोळखी शहर, पाऊस आणि मार्गदर्शनाच्या अभावी त्यांना अपयश येत आहे.

हा आदिवासी खलाशी भाऊचा धक्का येथील एका मच्छीमार बोटीवर काम करतो. ३१ आॅगस्टच्या मध्यरात्री तो धक्क्यानजीकच्या परिसरात अन्य तीन साथीदारांसह तत्काळ गावी जाण्याचा हट्ट करीत होता. मात्र मद्यपान केल्याने त्याला सकाळी निघण्याचा सल्ला दिल्यावर त्याने तो फेटाळून लावत वाद घातला. हा प्रकार तेथे गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या लक्षात आल्याने त्याची रवानगी चमार गोदीनजीकच्या चौकीत केली. तेथे घडला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडण्याचे ठरवले. परंतु नारायणने अन्य साथीदारांसह जाण्यास नकार दिल्यावर, त्याला धक्क्याकडे घेऊन येऊ असे पोलिसांनी सांगितले. १ सप्टेंबरच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास ते तिघे बाहेर पडले. मात्र बराच वेळ होऊनही साथीदार न परतल्याने त्यांनी चौकी गाठली मात्र तेथून तो बाहेर पडल्याची माहिती मिळताच त्यांनी सायंकाळी ही घटना दूरध्वनीद्वारे कडू कुटुंबियांना दिली.

मात्र तो घरीही न परतल्याने कुटुंबीयांनी २ सप्टेंबरला मुंबई गाठून शोध घेतला. परंतु त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे चौकी गाठून तेथील सीसीटिव्ही फुटेज पाहिले असता, तो तेथून एकटाच बाहेर पडल्याचे पोलिसांनी कुटुंबियांना दाखवले. त्याने केलेले मद्यपान, अनोळखी शहर यामुळे त्याला एकटे सोडण्याऐवजी त्याचे साथीदार, बोटमालक किंवा कुटुंबीयांशी संपर्क साधणे आवश्यक होते. मात्र पोलिसांनी ही खबरदारी न घेतल्यानेच तो गहाळ झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

याबाबतची तक्र ार नोंदविण्यात यलो गेट पोलीस ठाण्यात गेले असता, ही चौकी शिवडी पोलीस हद्दीत येत असल्याने त्यांनी तेथे तक्रार नोंदवावी, तर यलो गेट हद्दीतून त्यांना ताब्यात घेतल्याने त्यांनीच ही नोंद घेतली पाहिजे अशा पोलिसांच्या हद्दीच्या वादात हे कुटुंबीय सापडले आहे. तर गणेशोत्सवाचे कारण देत मदत करण्याऐवजी बोटमालकही चालढकल करीत असल्याने पाड्यावरचे आदिवासी युवक त्याच्या नातेवाईकांसह या शहरातील रेल्वे स्थानके, सरकारी रुग्णालये तसेच विविध रस्त्यांवर फिरून शोधाशोध करीत आहेत. दिवसभर शोध घ्यायचा, रात्रीची ट्रेन पकडून दीडशे किलोमीटरचा प्रवास करून पाडा गाठायचा, पुन्हा पहाटे शहराची वाट धरायची अशी केविलवाणी धडपड दहा दिवसांपासून सूरू असल्याची माहिती रोहित कडू या आदिवासी युवकाने ‘लोकमत’ला दिली.

बेपत्ता खलाशी हा पूर्वी वीटभट्टी मजूर असून पहिल्यांदाच मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून गेला होता. त्याच्या घरी पत्नी आणि तीन छोटी मुलं आहेत. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे तो गहाळ झाला असून हद्दीचा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी तक्रार न नोंदवल्याने त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. - छगन मेढा, शोध मोहिमेतील आदिवासी युवक

या प्रकाराबाबत आपल्याला काही कल्पना नाही. याबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात येईल.
- प्रणव अशोक, प्रवक्ते, उपायुक्त, पोलीस आयुक्तालय

Web Title: Tribal sailor missing in Mumbai Dahanu missing from Mumbai police post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.