आदिवासी खलाशी परराज्यातील बंदराकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:05 PM2019-07-25T23:05:44+5:302019-07-25T23:06:32+5:30
रोजगाराअभावी आठ महिने बाहेर : प्रशासनाचे अपयश; शासकीय अनास्थेमुळे स्थलांतर
डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्यात स्थानिक पातळीवर रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने हजारो आदिवासी महाराष्ट्रासह गोवा आणि गुजरातच्या मासेमारी बंदराकडे स्थलांतर करतात. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात या प्रक्रियेस सुरुवात झाली असून त्यांना वर्षातील आठ महिने घरापासून लांब राहावे लागणार आहे. अनेक सरकारे आली, मात्र ही समस्या जैसे थे असून शासकीय अनास्थेमुळेच हा वनवास त्यांना भोगावा लागतो आहे.
डहाणू आणि तलासरी या तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न बिकट आहे. येथे मासेमारी व्यवसायाकरिता अकुशल कामगार तुटपुंज्या मजुरीवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. त्याचा लाभ गोवा आणि गुजरात बंदरातील मासेमारी व्यावसायिक घेतात. एक फिशिंग २० ते २५ दिवसांची असल्याने बंदरातून निघण्यापूर्वी इंधन, जाळी, स्वयंपाकाचे साहित्य, पिण्याचे पाणी भरण्याची सर्व प्रकारची कामे खलाशांनाच करावी लागतात. खोल समुद्रात मासेमारी जाळी टाकण्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरु वात होते. तेथे हाती आलेल्या माशांची वर्गवारी, प्रतवारी करून बर्फ आणि मीठ इ.मध्ये त्यांच्या साठविण्याचे आणि स्वयंपाकाचे काम करावे लागते. आॅगस्ट ते मे या काळात सुमारे दहा फिशिंग केल्या जातात.
मात्र खलाशांना मिळणारे उत्पन्न खूपच तुटपुंजे असते. मासेमारी हंगामाच्या प्रारंभीच्या टप्यात जास्तीचा नफा कमाविण्यासाठी बोट मालकांकडून तांडेलला बोनसचे आमिष दिले जाते. त्याला बळी पडून अजस्त्र लाटांचा सामना करीत खलाशांचा जीव धोक्यात घालून मासेमारी होते.
या वादळ आणि जोरदार पावसाच्या तडाख्यात सापडून आजतागायत अनेक खालशांना जीव गमवावा लागला आहे. बहुतेक खलाशांकडे बायोमेट्रिक कार्ड नसून रीतसर नोंदींचाही अभाव आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून खलाशी स्थलांतरीत होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून सुमारे १० आॅगस्टपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. कुटुंबापासून दूर जाण्यास खलाशी नकार देतात. यामुळे बोटमालकांकडून त्यांना अनेक आमिष दाखवले जाते.