पालघरमध्ये हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:51 AM2019-08-15T00:51:53+5:302019-08-15T00:52:14+5:30
भारतातून ब्रिटिशांना हाकलून लावण्यासाठी करण्यात आलेल्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभागी झालेल्या आणि हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना बुधवारी हजारोंच्या संख्येने एकत्र येत पालघरमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.
पालघर - भारतातून ब्रिटिशांना हाकलून लावण्यासाठी करण्यात आलेल्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभागी झालेल्या आणि हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना बुधवारी हजारोंच्या संख्येने एकत्र येत पालघरमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी हुतात्म्यांच्या रक्ताने न्हालेल्या ध्वजाचे पूजन झाले.
ब्रिटिशांविरोधात संपूर्ण देशभर ‘चले जाव’ आंदोलन धगधगत असताना १४ आॅगस्ट १९४२ रोजी पालघर तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात पालघर तालुक्यातील तारापूर, घिवली, वडराई, सातपाटी, शिरगाव, बोईसर, नवापूर, मनोरसह अनेक गावांमधून नागरिक आणि राष्ट्र सेवा दलाचे हजारो देशभक्त सदस्य सहभागी झाले होते. स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उत्स्फूर्त प्रेरणेने भारावलेले स्वातंत्र्यसैनिक घोषणा देत पालघर तहसीलच्या दिशेने हळूहळू कूच करू लागले होते. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने वातावरण तंग होते, अहिंसेच्या मार्गाने सुरू असलेल्या या मोर्चावर इंग्रजांनी लाठीमार व गोळीबार सुरू केला. इंग्रज अधिकारी अल्मेडा यांच्या आदेशाने झालेल्या गोळीबारात पालघर तालुक्यातील नांदगाव येथील गोविंद गणेश ठाकूर, सातपाटी येथील काशिनाथभाई हरी पागधरे, पालघर येथील रामप्रसाद भीमाशंकर तेवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवड येथील सुकुर गोविंद मोरे या पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यांच्या बलिदानातून तरुणांनी स्फूर्ती घ्यावी यासाठी शहरात हुतात्मा स्तंभाची उभारणी करण्यात आली.
या प्रसंगी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसह, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आ. अमित घोडा, जिप अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष निलेश गंधे, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, नगराध्यक्षा उज्ज्वला काळे आदी उपस्थित होते.
अभिवादनासाठी गर्दी
या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी १४ आॅगस्टला पालघर येथील हुतात्मा चौकात १२ वाजून ३९ मिनिटांनी शालेय विद्यार्थी, नागरीक मोठ्या संख्येने एकत्र येतात.