गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड : स्लॅक सुपरव्हिजनची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 01:47 AM2020-05-08T01:47:59+5:302020-05-08T01:48:23+5:30
२० दिवसांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट
पालघर/कासा : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे दोन साधू व त्यांच्या चालकाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी, तब्बल २० दिवसांनंतर घटनास्थळाला भेट दिली. या तिहेरी हत्याकांडाआधी जिल्ह्यात अफवांनी जोर धरला असताना वेळीच पोलीस प्रशासनाला हे हत्याकांड रोखता आले नसल्याची टीका होत आहे. त्यामुळे ‘स्लॅक सुपरव्हिजन’ झाले आहे का? या प्रश्नावर आपण यासंदर्भात माहिती घेत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
१६ एप्रिल रोजी गडचिंचले या आदिवासीबहुल भागात दोन साधू व त्यांच्या गाडीच्या चालकाची निर्घृण हत्या झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट दिली. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, आ.राजेश पाटील, आ. श्रीनिवास वणगा, जि.प. सभापती काशिनाथ चौधरी, सदस्य शिवा सांबरे आदी उपस्थित होते.
याप्रकरणी आतापर्यंत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करीत ३५ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास असताना २१ दिवसांत काही महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या का, याची माहिती देण्यापेक्षा राज्यातील व जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी व त्यावरील उपाययोजनांची माहिती देण्यास गृहमंत्र्यांनी स्वारस्य दाखविले. त्यामुळे गडचिंचलेप्रकरणी चर्चा लांबवली जाऊ नये, याची विशेष काळजी त्यांनी घेतली का, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरोपींबाबत चौकशीनंतर निर्णय
या प्रकरणात अटक केलेल्या ११५ आरोपींपैकी काही आरोपींचा या प्रकरणाशी संबंध नसल्याने त्यांना या प्रकरणातून वगळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत गृहमंत्र्यांना विचारणा केली असता, याबाबत पूर्ण चौकशी करुन मगच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अफवांच्या अहवालावरही चौकशी सुरु
जिल्ह्यात चोर, दरोडेखोर फिरत असून, ते मुलांच्या किडण्या काढून नेत असल्याच्या अफवांबाबत पोलिसांनी अहवाल पाठविले होते का, यावर गृहमंत्र्यांनी होकार देत याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, आयुक्त गंगाधरन, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, उपजिल्हाधिकारी किरण महाजन आदी उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, त्यावेळी पक्षाचे लोकप्रतिनिधी त्यांच्यासमवेत होते. अशा परिस्थितीत पत्रकारांना मात्र पोलिसांनी वाटेतच रोखून धरले. पत्रकार परिषदेत गृहमंत्र्यांकडे पत्रकारांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.