तुळिंज हॉस्पिटलच्या जनरेटरने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Published: August 7, 2016 03:32 AM2016-08-07T03:32:20+5:302016-08-07T03:32:20+5:30
नालासोपारा शहरात गजबजलेल्या वस्तीत असलेल्या वसई विरार पालिकेच्या हॉस्पीटलमध्ये चोवीस तास वीजपुरवठा सुरु रहावा यासाठी डिझेल जनरेटर बसवण्यात आले आहे.
वसई : नालासोपारा शहरात गजबजलेल्या वस्तीत असलेल्या वसई विरार पालिकेच्या हॉस्पीटलमध्ये चोवीस तास वीजपुरवठा सुरु रहावा यासाठी डिझेल जनरेटर बसवण्यात आले आहे. मात्र, त्यातून निघणारा धूर आणि प्रचंड आवाजामुळे त्रस्त झालेल्या लोकांनी पालिकेकडे तक्रार केली आहे.
नालासोपारा शहरात विजेचा लपंडाव नेहमी सुरु असतो. त्यावर उपाय म्हणून पालिकेने हॉस्पीटलमध्ये डिझेल जनरेटर बसवले आहे. त्यामुळे हॉस्पीटलमध्ये चोवीस तास वीजपुरवठा सुरु राहतो. पण, या जनरेटरमधून निघत असलेला धूर, दुर्गंधी आणि कर्कश आवाजामुळे हॉस्पीटलच्या परिसरातील लोक त्रस्त झाले आहेत. या लोकांनी पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या. पण त्याची कुणीच दखल घेतली नाही. शेवटी शिवसेनेचे शाखाप्रमुख रविकांत नागरे यांनी याबाबत तक्रार केल्यावर त्याची दखल सहाय्यक आयुक्तांनी घेतली. मात्र, पर्यायी जागा नसल्याने जनरेटर हलवणे अशक्य असल्याचे त्यांनी कळविले आहे. मात्र, धूर रोखण्यासाठी धुरांड्याच्या तोंडावर चिमणी बसवली जाईल. तसेच आवाज होऊ नये यासाठी ध्वनी प्रतिबंध केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)