रस्त्यावरील मोरी गेली वाहून
By admin | Published: January 25, 2017 04:34 AM2017-01-25T04:34:43+5:302017-01-25T04:34:43+5:30
या तालुक्यातील गुजरात व दादरानगर हवेली राज्यांना लागून असलेल्या ग्रामपंचायत रुईघर गोंडपाडा रस्त्यावरील मोरी वाहून गेली आहे.
जव्हार : या तालुक्यातील गुजरात व दादरानगर हवेली राज्यांना लागून असलेल्या ग्रामपंचायत रुईघर गोंडपाडा रस्त्यावरील मोरी वाहून गेली आहे. त्यामुळे तो मृत्यूचा सापळा बनला असून नागरिकांवर जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील रूईघर पैकी गोंडपाडा या पाड्यावर जाण्यासाठी लागणाऱ्या रस्त्यातील ओहळावरील संपूर्ण मोरी वाहून गेली आहे. त्यामुळे कोणतेही वाहन या मार्गावरुन नेणे अशक्य बनले आहे. मोरीचे पूर्ण पाईप उघडे पडले आहेत. त्यामुळे येथून जाणे-येणे नागरिकांना व विद्यार्थांना गैरसोयीचे झाले असून मोरीच्या भिंतीला धरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. यापूर्वी या नादुरु स्त मोरीवरून पायी चालतांना मोरीवरून खाली पडून अपघात घडले आहेत.
रु ईघर ग्रामपंचायतीचा गोंडपाडा असून या पाड्यात ३२ आदिवासी कुटुंब राहत आहेत. या पाड्यावर जिल्हा परिषदेची शाळा आहे. येथील शिक्षकांना मेनरोडवर दुचाकी ठेऊन ओहोळ उतरून शाळेत जावे लागत आहे. येथील नागरिकांना पावसाळ्यात कसरत करावी लागत आहे. गर्भवतींना आणि रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणे जोखमीचे बनत आहे.
मात्र. या रस्त्याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे. येथील नागरिकांनी मोरीची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेला वारंवार लेखी पत्रे देऊनही तिच्या दुरुस्तीचे काम न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नादुरूस्त मोरीचे काम लवकरच करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. जर ती तात्काळ मान्य झाली नाही तर या परीसरातील जनता प्रखर आंदोलन उभे करेल असा इशाराही नागरीकांनी जिल्हा परीषदेला दिलेला आहे. (वार्ताहर)