जनजागृती मोहीम राबविल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला; कोरोनाच्या सावटातही ८१ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:50 AM2021-01-29T00:50:54+5:302021-01-29T00:51:04+5:30
याआधीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी पाहिली तर ग्रामपंचायतीसाठी झालेले मतदान खूपच जास्त आहे.
पालघर : पालघर जिल्ह्यात तीन ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये मतदारांनी कोरोना प्रादुभावाचे संकट असतानाही मोठ्या संख्येने मतदान केल्याचे दिसून आले. यावेळी ८१.४५ टक्के मतदारांनी मतदान केले. यावरून प्रशासनाने जनजगृती राबविल्यामुळेच मतदानाचा टक्का वाढला असल्याचे स्पष्ट होत आहे.
याआधीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी पाहिली तर ग्रामपंचायतीसाठी झालेले मतदान खूपच जास्त आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ६३.७३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही ६१.५३ टक्के मतदारांनी मतदान केले होते. विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ५९.३२ टक्के मतदारांनी मतदान केले होते, तर २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत साधारणत: तेवढेच म्हणजे सरासरी ६० टक्के मतदान झाले होते, असे सांगण्यात आले.
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत अलीकडेच ग्रामपंचायतींसाठी झालेले मतदान साधारणत: २० टक्क्यांनी जास्त असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या दरम्यान जनजागृती मोहीम राबवली जात असते. विविध उपक्रमातून जागृती केली जाते. त्याचा मतदानावर काही प्रमाणात परिणाम नक्कीच होत असतो, त्यातूनच मतांची टक्केवारी वाढत असते.
लोकसभेसाठी मतदान
पालघर जिल्ह्यात एकच लोकसभा मतदारसंघ असून २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ६३.७३ टक्के मतदान झाले होते. त्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावित निवडून आले होते. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव केला होता.
विधानसभेसाठी मतदान
पालघर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात बविआचे तीन आमदार निवडून आलेले असून राष्ट्रवादी एक, कम्युनिस्ट एक आणि शिवसेना एक असे बलाबल आहे. २०१९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये साधारणत: ६० टक्केच मतदान झाले होते.
ग्रामपंचायतीसाठी मतदान
ग्रामपंचायतीसाठी उभे राहणारे उमेदवार हा स्थानिक असल्याने त्यांना बहुसंख्य मतदार ओळखत असतात. त्यामुळे प्रत्येक घरातील मतदार मतदानासाठी बाहेर पडावेत यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते स्वत: प्रयत्न करीत असतात, ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची बाब आहे.