वसईत मुलाला पळविणाऱ्यांपैकी दोघांना बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 05:00 AM2019-01-07T05:00:25+5:302019-01-07T05:00:50+5:30
कौटुंबिक वादातून अपहरण : १० तासांत मुलाला शोधण्यात पोलिसांना यश; अपहरण करणाºयांच्या टोळीमध्ये पित्याचा समावेश
वसई : वसईतील गिरीज येथे शुक्र वारी संध्याकाळी चार दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी एका महिलेच्या तीन वर्षे वयाच्या मुलाचे अपहरण केले. या प्रकरणी मुलाच्या बापाचा सहभाग स्पष्ट होताच बाप व त्याच्या साथीदाराला ग्रामस्थांनी रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनीही तात्काळ नाकाबंदी करत दहा तासात शोध घेत मुलाला आईच्या स्वाधीन केले. वसई कोर्टात दोंन्ही आरोपींना शनिवारी हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.
वसईत गिरीज येथे राहणाºया डॅजलिना गॉडफ्री परेरा (३५) या महिलेचा आंतरजातीय विवाह भिषम कपूरसोबत २०१४ ला झाला होता. मात्र पतीचे दुसºया महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयाने त्यांच्या संसारात वादळ निर्माण झाले. या त्रासाला कंटाळून मुलगा विहान (३) याला घेऊन ती २९ आॅक्टोबर २०१८ रोजी घर सोडून गिरीज येथे माहेरी येऊन राहू लागली. पतीपासून विभक्त होण्यासाठी तिने वसई न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला आहे. याचदरम्यान ३० आॅक्टोबर पासून डॅजलिना आई व मुलासोबत गोखीवरे येथे मामाच्या घरी काही दिवसांसाठी राहण्यास गेली होती. तेथे तीचा पती भिषम हा मुलाचा ताबा घेण्यासाठी आला होता. मात्र डॅजलिना हिने त्यास नकार दिला.
गुरूवारी ४ जानेवारी रोजी संध्याकाळी ४.३० वाजता डॅजलिना गिरीज येथून मुलाला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी रस्त्यावर उभी असताना चार दुचाकीवरून पती भिषमसोबत आलेल्या आठ अनोळखी व्यक्तींनी तिच्या हातून मुलाला हिसकावून नेत त्याचे अपहरण केले. अचानक झालेल्या या प्रकाराने भांबावलेल्या डॅजलिनाने मदतीसाठी धावा करीत पती भिषम व त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला पकडून ठेवले. तिच्या मदतीला तिची आईही यावेळी धावून आली. स्थानिक ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात येताच महिलेचा पती भिषम व त्याच्या साथीदाराला रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. डॅजलिनाने पती व इतर आठ अनोळखी व्यक्तींविरोधात अपहरण केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवीला आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शहरात सर्वत्र नाकाबंदी करत मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. यासाठी पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते. शुक्र वारी रात्री उशीरा पोलिसांनी अपहरण केलेल्या मुलाला बालाजी होटेल, वसई रोड येथे ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला तेथून ताब्यात घेऊन पहाटे ३.३० वाजता आईच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र अपहरण करणारे इतर सात आरोपी अजूनही फरारी आहेत.
सदर महिला व अपहरण कर्ता हे पती -पत्नी असून त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. मुलाचा ताबा घेण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. इतर आरोपींचाही तपास सुरू आहे.
- राजेंद्र कांबळी,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वसई