अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 04:42 PM2024-02-15T16:42:04+5:302024-02-15T16:43:25+5:30
११ लाख ८४ हजारांचे अंमली पदार्थ केले हस्तगत.
मंगेश कराळे,नालासोपारा :- अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींना तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपीकडून ११ लाख ८४ हजारांचे एमडी आणि ब्राऊन शुगर असे अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी गुरुवारी दिली आहे.
मंगळवारी तुळींजचे पोलीस अंमलदार पांडुरंग सगळे यांना माहिती मिळाली की, तुळींजच्या मराठी शाळेजवळील साईप्रेरणा अपार्टमेंट या इमारतीच्या समोर एक महिला आणि एक पुरुष असे दोघे जण अंमली पदार्थाची विक्री करत आहेत. सदरबाबत तुळींज विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडून कारवाई करणेबाबत आदेश प्राप्त केला. तुळींजचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावुन सापळा रचून आरोपी पौर्णिमा राठोड (६०) आणि बजरंग कसबे (२४) यांना ताब्यात घेतले. दोघांची अंगझडती घेतल्यावर पौर्णिमाकडे ६ लाख रूपये किंमतीचा ६० ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ मिळाला. तसेच बजरंगकडे ५ लाख ५० हजार रुपयांचा ५५ ग्रॅम वजनाचा एमडी व ३४ हजार ४०० रुपयांचा ३.४४० ग्रॅम वजनाचा ब्राऊन शुगर असा एकुण ११ लाख ८४ हजार ४०० रूपयांचा अंमली पदार्थ मिळून आला. तुळींज पोलिसांनी एनडीपीएस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. जप्त मुद्देमाल कोठुन खरेदी केला याबाबत आरोपीकडे चौकशी केल्यावर सदरचा मुद्देमाल अंकुश गवा याचेकडुन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक महिला आरोपी ही सराईत अंमली पदार्थ तस्कर तसेच रेकॉर्डवरिल हिस्ट्रीशिटर गुन्हेगार असुन, तिचे विरूद्ध यापुर्वी २ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस हवालदार पांडुरंग केंद्रे, उमेश वरठा, शेजवळ, शुभांगी जाधव, कदम, सगळे, राजगे यांनी केली आहे.