दोन आरोपींचा दोन किलोमीटर दुचाकीने केला पाठलाग; मोबाईल खेचून पळणाऱ्यांना महामार्ग पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 06:48 PM2023-10-18T18:48:35+5:302023-10-18T18:49:18+5:30
दोन्ही पोलीस हवालदारांनी दोन्ही आरोपींच्या दुचाकीचा २ किलोमीटर पाटलाग करुन शिताफीने त्यांच्यावर झडप घालून पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- १८ वर्षीय तरुणीच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी मोबाईल खेचून पळताना महामार्ग पोलिसांनी दोन किलोमीटर पाठलाग करून पकडले. दोन्ही आरोपींना पेल्हार पोलिसांच्या ताब्यात तपास व चौकशीसाठी देण्यात आले आहे.
वसई फाटा येथील इंदिरा वसाहत येथे राहणारी तनु यादव (१८) ही सोमवारी दुपारी अष्टविनायक इंडस्ट्री मधील कामावरून जेवण करण्यासाठी घरी आली होती. जेवण करून कंपनीत रस्त्याने पायी चालत परतत असताना महामार्गावरील वसई ब्रीजच्या सर्व्हिस रोडवर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तिच्या हातातील मोबाईल जबरदस्त खेचून चोरी करून पळून गेले. त्याचवेळी चिंचोटी येथील महामार्ग पोलीस हवालदार नान्नर व पानसरे हे महामार्गवर सर्विस रोडला वाहतूक नियमन व पेट्रोलिंग करत होते. सदर तरुणीने मोबाईल खेचला असता आरडाओरडा केला. त्यावेळी दोन्ही पोलीस हवालदारांनी दोन्ही आरोपींच्या दुचाकीचा २ किलोमीटर पाटलाग करुन शिताफीने त्यांच्यावर झडप घालून पकडले.
तरुणीचा मोबाईल खेचून नेल्याबाबत खात्री करुन दोन्ही आरोपींना पेल्हार पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती चिंचोटी महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण यांनी लोकमतला दिली आहे. तसेच पकडलेल्या आरोपींकडून वसई, विरार, नालासोपारा येथील मोबाईल व सोनसाखळी स्नॅचिंगचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.