वसई-विरार शहरात दोन दिवस पाणीबाणी; कमी दाबाने होणार पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 10:47 AM2021-11-25T10:47:22+5:302021-11-25T10:47:54+5:30
वसई पूर्वेस वरई फाट्यावर सूर्याच्या जुन्या जलवाहिनीला मोठीं गळती
पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरई फाट्यावर सुर्या धरणाच्या जुन्या जलवाहिनीला बुधवारी मोठी गळती सुरू झाल्यानें वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामास शुक्रवारी सुरुवात होत आहे. त्यामुळे, आता पुढील दोन दिवस वसई विरार शहरात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने लोकमतला सांगितले
या संदर्भात अधिक माहिती देताना पाणीपुरवठा नियंत्रक यांनी सांगितले की, वसई-विरार शहर महापालिकेच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या जुन्या जलवाहिनीला वरई येथे बुधवारी गळती सुरू झाली आहे. या दुरुस्तीचे काम पालिका शुक्रवार २६ नोव्हेंबर रोजी हाती घेऊन सुरू करण्यात येणार आहे. सदरचे हे काम सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार असून यासाठी जवळपास १२ तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे या जुन्या जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. तर सूर्याच्या नवीन योजनेतून होणारा पाणीपुरवठा सुरळीत चालू राहिल. मात्र, यामुळे पुढील दोन दिवस शहरात कमी दाबाने पाणी येणार असल्याने शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहनही पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.