तारापूर येथील स्फोटात दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:05 AM2019-05-29T01:05:48+5:302019-05-29T01:06:02+5:30

ऑर्गेनिक्स प्रा. लि. या रासायनिक कारखान्यात सोमवारी रात्री अत्यंत ज्वालाग्राही रसायनाचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये एक सुपरवायझर व एक ऑपरेटर भाजून जखमी झाले

Two injured in Tarapur blast | तारापूर येथील स्फोटात दोन जखमी

तारापूर येथील स्फोटात दोन जखमी

Next

- पंकज राऊत

बोईसर : तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एन- १५४ मधील वर्षा ऑर्गेनिक्स प्रा. लि. या रासायनिक कारखान्यात सोमवारी रात्री अत्यंत ज्वालाग्राही रसायनाचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये एक सुपरवायझर व एक ऑपरेटर भाजून जखमी झाले असून यापैकी एक जण गंभीर असून दोघानाही मालाड येथील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कारखान्यामध्ये रासायनिक प्रक्रि या सुरू असतांना रात्री १२ वाजून २० मिनिटांनी प्रचंड स्फोट होऊन आग लागली तेव्हा सुपरवायझर व ऑपरेटरसह एकूण ७ जण कारखान्यात काम करीत होते. भयंकर स्फोटानंतर कारखान्याचे पत्रे हवेत उंच उडुन जमिनीवर आदळले. तर स्फोटानंतर उंच धुराळा हवेत उडून अंधार पसरून सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळी एमआयडीसी चे तारापूर अग्निशमन दलाचे बंब त्वरीत घटनास्थळी पोहचून आग विझविण्याचे काम सुरू केल्यानंतर या आगी व धुरातून काही वेळातच पाच जण जीव मुठीत धरून बाहेर पडले मात्र दोन जण मध्येच अडकले होते परंतु ते ही १२:४० च्या सुमारास जखमी अवस्थेत बाहेर पडले त्या दोघांनाही रुग्णवाहिका न मिळाल्याने पोलिसांनी त्यांच्या वाहनांमधून एमआयडीसी मधील तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेत सुपरवायझर सुधीर धुमाळ (३५ वर्षे ) हे १५ टक्के तर आॅपरेटर प्रमोद भगत (३८ वर्षे ) हे ५७ टक्के भाजले असून त्यांच्यावर तुंगा हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मालाड येथील तुंगा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. तर सोमवारी रात्री ८ वाजता दुसरी शिफ्ट सुरू झाली तेव्हा प्रमोद भगत, सुधीर धुमाळ, या जखमी सह अंकुरा माची, गुड्डू सिंग, अखिलेश सिंह व इतर एक असे एकूण सहा जण कामावर होते असे बोईसर पोलिसांनी सांगितले. या कारखान्याच्या आवारात पत्रे फुटून त्याचा खच पडला आहे. या स्फोटाच्या हादऱ्याने शेजारच्या एसएनए हेल्थ केअर या कारखान्याच्या खिडक्या तुटून इक्वीपमेंट डॅमेज होऊन संरक्षण भिंत व पुफ पॅनेल ही डॅमेज झाले असल्याचे पत्र व्यवस्थापनाने पोलिसांना दिले आहे तर स्फोटाचा आवाज परिसरात ३ ते ४ कि. मी. पर्यंत आला होता.
>कारखान्याचे नेमके नाव काय ?
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दि. २२ एप्रिल, २०१९ रोजी दिलेल्या कन्सेंटमध्ये कारखान्याचे नाव वर्षा आॅर्गनिक्स प्रा.लि.तर एमआयडीसीच्या पाणी बिलावर व्हिनस केम इंडस्ट्रीज तर सर्वात गंभीर बाब म्हणजे कारखान्यातून सापडलेल्या कागदपत्रांवर सेरिगो एॅडीटीव्हज प्रा. लि. एन -१५४ आहे.
>एकही रु ग्णवाहिका घटनास्थळी फिरकली नाही!
अवघ्या दहा मिनिटात बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम घटनास्थळी फौज फाट्यासह पोहचले. काही वेळाने दोन जण जखमी अवस्थेत बाहेर पडले त्यांना रुग्णालयात नेण्याकरिता पाच ते सहा रु ग्णवाहिकांशी संपर्क साधला. परंतु कोणीही फिरकले नाही शेवटी पोलिसांच्या वाहनातून जखमींना रुग्णालयात नेले.
>नेमकी कुठले उत्पादन सुरु होते?
या रासायनिक कारखान्यांमध्ये घटना घडली तेव्हा एन - ब्युटाईल १,२ बेन्झीसोथीयझोलीन हे कन्सेट प्रमाणे उत्पादन सुरू असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांनी सांगितले.
>कारखान्यातील एका रिअ‍ॅक्टरमध्ये ब्यूटाईल अमाईन हे ज्वालाग्रही रसायन वापरून त्या वर रिअ‍ॅक्शन सुरू होती दरम्यान त्या रिअ‍ॅक्टरमध्ये दुसरे रसायन अ‍ॅड करण्यात येत होते परंतु त्या रसायनाचे प्रमाण चुकल्याने त्या रिअ‍ॅक्टरमध्ये असलेले ज्वालाग्रही रसायन बाहेर येऊन त्याचा हवेशी संपर्क स्फोट झाला असा प्राथमिक अंदाज आहे
-अ.वि.बाईत, डेप्युटी डायरेक्टर, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय

Web Title: Two injured in Tarapur blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.