सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोलबच्चन गॅंगच्या दोन सराईत आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 05:18 PM2023-11-03T17:18:18+5:302023-11-03T17:18:50+5:30
रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या सामान्य नागरिकांना वाटेत बोलबच्चन करून फसवणूक करणाऱ्या दोन सराईत आरोपींना विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
(मंगेश कराळे)
नालासोपारा :- रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या सामान्य नागरिकांना वाटेत बोलबच्चन करून फसवणूक करणाऱ्या दोन सराईत आरोपींना विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपीकडून पाच गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे. एका आरोपी विरोधात ५३ तर दुसऱ्या आरोपी विरोधात १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली.
विरारच्या फणसपाडा येथे राहणारे नरेश दत्तू पाटील (६२) हे २१ सप्टेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास बाजार वार्ड, पंचामृत हॉटेल जवळून पायी चालत जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना रस्त्यात थांबवले होते. एकाने हाताला पकडून मला ओळखले नाहीत का असे विचारत त्यांना बोलण्यात गुंतवले. त्यानंतर त्यांच्या खिशातून ४ हजाराची रोख रक्कम व गळ्यातील ९० हजाराची सोन्याची चैन काढून एकूण ९४ हजाराचा मुद्दैमाल घेऊन दोघे पसार झाले होते. याप्रकरणी विरार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यामध्ये सदरचा गुन्हा सराईत आरोपी विजय तांबे याने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीची तांत्रिक माहीती व गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे सराईत आरोपी विजय दत्ताराम तांबे (५४) आणि अजय अशोक सावंत (५०) या दोघांना सापळा रचुन ताब्यात घेऊन सदर गुन्हयात अटक केली आहे. आरोपीकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केल्यावर पाच गुन्ह्यांची उकल केली आहे.
अटक आरोपीत हे लोकांना काय रे तु मला ओळखले नाही का ? असे बोलुन, त्यांना बोलबच्चन देवुन, हातचलाखीने लोकांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम काढुन घेवुन, फसवणुक करण्याची गुन्हे करत असतात. दोन्ही आरोपींवर मुंबई, ठाणे, पालघर या जिल्हयांत अनेक गुन्हे दाखल आहेत. विजय तांबेच्या विरोधात ५३ तर अजय सावंतच्या विरोधात १३ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजित मडके, व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, योगेश नागरे, संदिप शेळके, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार, नामदेव ढोणे व सोहेल शेख यांनी केली आहे.