वसईच्या दोन पोलिसांना गस्तीच्या वेळी मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 11:59 PM2021-01-03T23:59:59+5:302021-01-04T00:00:07+5:30
गुन्हा दाखल : चार आरोपींना केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : वसई पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई आणि होमगार्ड शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना, चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसई पोलिसांनी चारही आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
वसई पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सौरभ दराडे (२५) आणि होमगार्ड अशोक चव्हाण हे दोघे शुक्रवारी रात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास पापडी नाका येथे पेट्रोलिंग करत होते. कोरोनामुळे रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत जमावबंदी, कर्फ्यूचा आदेश असताना हर्षल एरल्ड नुनिस (२१), अबेद सायमन गोन्सालवीस (२२), राहुल राजेश चौबे (२१) आणि विकास गोपाळ धोबी (२१) हे चौघे जमून आरडाओरडा करत होते. त्यातील दोघे एका सलून दुकान मालकाच्या नावाने शिवीगाळ करत, बंद शटरवर दगडफेक करत दुकानाचा बोर्ड फाेडत होते.
गस्तीवरील पोलिसांनी चौघांना विचारणा केल्यावर दुकान मालकाचे आमच्या मित्राशी भांडण झाले असल्याने दुकानाची तोडफोड करतोय, असे त्यांनी सांगितले.
दोघेही पोलीस जखमी
पोलिसांनी आरोपींना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी हर्षल याने शिवीगाळ करून अंगावर मारण्यासाठी धावून आला. दोन्ही पोलिसांना जमिनीवर पाडून पोलीस शिपायाची कॉलर पकडून ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. यात दोघेही पोलीस जखमी झाले, तर तिन्ही आरोपींनी शिवीगाळ करून पोलिसांना मारा, अशी
चिथावणी दिली.