दोन वर्षाचा चिमुकला मध्यरात्री बाहेर पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:52 AM2018-01-20T00:52:29+5:302018-01-20T00:52:45+5:30
पहाटेचे दोन वाजलेले. सुनसान रस्त्यावरून एक दोन वर्षीय चिमुकला अंधाराची तमा न बाळगता आपल्याच तालात एकटाच चालत निघाला होता.
वसई : पहाटेचे दोन वाजलेले. सुनसान रस्त्यावरून एक दोन वर्षीय चिमुकला अंधाराची तमा न बाळगता आपल्याच तालात एकटाच चालत निघाला होता. दोन किलोमीटर निर्जन रस्त्यावर बसलेल्या काही मुलांनी या दोन वर्षाच्या मुलाला ताब्यात घेऊन पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला पालकांच्या हवाली केले. ही घटना आहे वसईतील खोचिवडे गावातील. येथील आॅस्टीन कोळी आपली आई, पत्नी व दोन मुलांसह एका एकमजली बंगल्यात राहतात. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांचा दोन वर्षांचा मुलगा नॅथनील पहिल्या मजल्यावरून खाली उतरून घराचे मुख्य दरवाजा आणि गेट उघडून तडक घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पाली चर्चपर्यंत चालत निघाला होता. एकतरा काळोखी रात्र. चोहोबाजूंना अंधार. रस्त्यावर भटकी कुत्री त्याच्या मागे भुंकत होती. पण, कसलीही तमा न बाळगता दोन वर्षांचा नॅथलीन रस्त्याने सरळ आपल्या नादात चालत निघाला होता. चर्चजवळ काही मुले गप्पा मारत बसली होती. त्यांचे लक्ष नॅथलीनकडे गेले. त्यांनी नॅथलीनला आपल्या ताब्यात घेतले. जवळच राहणाºया एका लोहाराचा हा मुलगा असावा असे समजून ते त्याच्या घरी गेले. मात्र, लोहाराचा मुलगा घरातच झोपला होता. सुदैवाने त्याचवेळी वसई पोलिसांचे गस्ती पथक आले. नॅथनीलला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.