चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटा वापरून फसवणुकीचे प्रकार
By धीरज परब | Published: December 4, 2023 06:43 PM2023-12-04T18:43:50+5:302023-12-04T18:44:04+5:30
अनेकदा पोलीस आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचतात तेव्हा पैसे देण्यासाठी चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटांचा वापर करतात.
मीरारोड - अनेकदा पोलीस आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचतात तेव्हा पैसे देण्यासाठी चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटांचा वापर करतात. पण आता काही भामट्यांनी असली नोटांसारख्या दिसणाऱ्या त्या चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटांचा वापर लहान दुकानदार आदींना गंडवण्यासाठी चालवल्याचे प्रकार शहरात घडत आहेत. स्टेशनरी दुकानात भारतीय चलनातील नोटा सारख्या रंगसंगती व छपाई असलेल्या चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटा सहज विकत मिळतात. त्या नोटांवर क्रमांक नसतो लाल अक्षराने शाळा प्रकल्प वापरासाठी असे देखील लिहलेले असते. असली नोट पेक्षा ह्या नोट चा कागद पातळ असतो तसेच छपाईचा रंग हा चमकदार नसतो. परंतु ह्या खेळण्यातील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोटांचा वापर आता लोकांना ठकवण्या साठी काही भामट्यांनी सुरु केला आहे.
भाईंदरच्या एका स्टॉल चालकास देखील असाच अनुभव आला. शनिवारी रात्रीच्या वेळी स्टॉल वर काहीशी गर्दी पाहून एका इसमाने १०० रुपयांची घडी केलेली नोट चालकाच्या समोरील बरणी वर ठेवली. त्याने १० रुपयाची वस्तू मागितली व वस्तू आणि वरची ९० रुपये लवकर द्या, बस चालली आहे असे त्याने सांगितले. स्टॉल चालकाने देखील ती घडी केलेली नोट १०० रुपये समजून गल्ल्यात ठेवली आणि १० रुपयांची वस्तू देऊन वरचे ९० रुपये त्याला परत केले.
रात्री स्टॉल बंद करते वेळी चालकाने नोटा मोजण्यास घेतल्या असता ती घडी केलेली १०० रुपयांची नोट उघडली असता ती खोटी चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाची असल्याचे आढळून आले. दरम्यान अश्या प्रकारे चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या खोट्या नोटा वापरुन लोकांना फसवले जात असल्याचे प्रकार अन्यत्र सुद्धा घडल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. वेश्या व्यवसाय चालवणाऱ्याना पकडण्यासाठी अनेकदा पोलीस हे बनावट गिऱ्हाईक सह त्या आरोपीला पकडण्यासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेत ह्या चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटांचा वापर करत असतात. बंडल मध्ये वरची आणि खालची नोट खरी ठेवायची आणि आतील नोटा ह्या चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या ठेवतात. पण आता मुलांच्या खेळण्यातील नोटांचा वापर लहान-सहान दुकानदार आदींना हेरून फसवणुकीसाठी केला जात असल्याचे प्रकार पाहून पोलीस अधिकारी देखील अचंबित झाले आहेत. लोकांनी लहान - मोठ्या रकमेच्या नोटा घेताना त्या तपासून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.