उचाट ग्रामपंचायत १० वर्षे सरपंचाविना, आरक्षित प्रवर्गातील उमेदवार मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 03:04 AM2017-10-27T03:04:43+5:302017-10-27T03:04:47+5:30
वाडा : तालुक्यातील उचाट या ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या दहा वर्षापासून सरपंचाविना असून प्रशासकाच्या हाती आहे.
वसंत भोईर
वाडा : तालुक्यातील उचाट या ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या दहा वर्षापासून सरपंचाविना असून प्रशासकाच्या हाती आहे. आरक्षित जागेवर उमेदवार मिळत नसल्याने व गावात संबंधित जातीचे रहिवासी नसल्याने गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायतीत त्यातील उमेदवार निवडून येत नसल्याने पद रिक्त आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे आहे. येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार विनंती केली असता नियमाच्या पलीकडे काही करता येत नसल्याने ही पदे रिक्तच आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या दहा वर्षापासून प्रशासक हाकतो आहे.
वाडा तालुक्यातील उचाट हे कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसित गाव आहे. मतदार ५५० इतके आहेत. या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत असून सदस्य संख्या ७ आहे. आता सरपंचपदासाठी एक जागा अतिरिक्त झाल्याने एकूण सदस्य संख्या आठ झाली आहे. येथे अनुसूचित जमाती साठी पाच जागा असून इतर मागास वर्ग (कुणबी) एक जागा आहे. व सर्वसाधारण दोन जागा असून असे एकूण आठ सदस्य आहेत. मात्र आरक्षित उमेदवार उपलब्ध नसल्याने या ग्रामपंचायतीची सदस्य पदे रिक्त असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार सरपंचविना आहे.
गेल्या पाच वर्षा पूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकाही आरक्षित जागेवर एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने ग्रामपंचायतीची सर्व सदस्य संख्या रिक्त होती. तशीच परिस्थिती आत्ताच झालेल्या निवडणुकीतही झाली. या गावाच्या हद्दीत फक्त दोन घरे अनुसूचित जमातीच्या नागरिकांची आहेत. त्यामुळे पाच अनुसूचित जमातीचे उमेदवार या गावात उपलब्ध नाहीत. असलेले नागरिक नोकरीमध्ये असल्याने उमेदवार मिळणे दुरापास्त झाले आहे.
तसेच या ग्रामपंचायतीत एक सदस्य इतर मागासवगीॅयांकरिता आहे. मात्र या गावात एकही घर इतर मागासवगीॅयांचे नसल्याने हा उमेदवार मिळत नाही. उर्वरित दोन जागा या सर्वसाधारण आहेत. सर्वसाधारण समाजाचे उमेदवार येथे उपलब्ध आहेत. पण फक्त दोन उमेदवार असताना ग्रामपंचायतीची स्थापना होऊ शकत नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायतीशिवाय या तिचा कारभार हाकला जातो. प्रशासकाच्या हाती या ग्रामपंचायतीची सत्ता आहे. ग्रामस्थांनी सदरची बाब तहसील व जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या साच्याच्या विरोधात प्रशासनाला जाता येत नाही. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही परिस्थिती जैसे थे आहे.
>यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. मात्र नियमाच्या पलीकडे त्यांना जात येत नाही. यासाठी आम्हाला आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील. या शिवाय आमच्याकडे आता दुसरा पर्यायच उरलेला नाही.
- प्रदीप मोरे, माजी सरपंच, ग्रामपंचायत उचाट
>वाडा हा आदिवासी बहुल तालुका आहे. त्यामुळे येथे आदिवासी समाजासाठी पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. उचाट येथे आदिवासी समाजाची लोकसंख्या अत्यंत कमी असून येथे दोन ते तीन घरे आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाचे (अनुसूचित जमाती) उमेदवार उपलब्ध होऊ शकले नाही. या ग्रामपंचायतीत उमेदवार अर्ज प्राप्त न झाल्याने येथील निवडणूक होऊ शकली नाही. पंधरा वर्षापासून येथे हीच परिस्थिती आहे.
- विठ्ठल गोसावी,
नायब तहसीलदार, वाडा