उमरोळी एक आदर्श गाव बनवणार- आठवले
By Admin | Published: October 29, 2015 11:21 PM2015-10-29T23:21:20+5:302015-10-29T23:21:20+5:30
देशाच्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखीन गरीब होत दोघांतली दरी वाढत चालली आहे. आपला देश स्वतंत्र झाला असला तरी सर्वसामान्य माणूस अजूनही स्वातंत्र्याची फळे खऱ्या
पालघर : देशाच्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखीन गरीब होत दोघांतली दरी वाढत चालली आहे. आपला देश स्वतंत्र झाला असला तरी सर्वसामान्य माणूस अजूनही स्वातंत्र्याची फळे खऱ्या अर्थाने चाखू शकला नसल्याची खंत रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांनी उमरोळी येथील कार्यक्रमात व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकारलेल्या सांसद आदर्श ग्रामयोजनेंतर्गत खासदार आठवले यांनी पालघर तालुक्यातील उमरोळी या गावाची निवड केली आहे. या गावातील विकासकामांचे उद्घाटन गुरुवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले.
गावस्तर व तालुकास्तरावरील सर्व अधिकाऱ्यांची सभा घेऊन गावाची गरज लक्षात घेऊन ६३ कामांची निवड करून प्रारूप विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. यामध्ये खारे पाणी प्रतिबंधक बंधारा, बायपास रोड, गटार बांधकाम, विद्युत वितरण विभागांतर्गत कामे, पाणीपुरवठा, वृक्षलागवड, इ ६३ प्रकारच्या कामांसाठी ६ कोटी ३० लाखांच्या खर्चाच्या निधीचा मंजूर आराखडा तयार करण्यात आला असून खासदार व जिल्हाधिकाऱ्याने या कामांना मंजुरीही दिली आहे. त्यापैकी राजस्व अभियानांतर्गत दाखलेवाटप, औषध फवारणी, तलावातील गाळ काढणे, रस्ते उभारणे इ. कामे पूर्ण झाली आहेत, तर आरोग्य उपकेंद्रे, पाण्याची टाकी उभारणे, वाचनालय, फळझाडे लागवड, कर्मचारी निवासस्थान इ. कामांचे भूमिपूजन झाले.
या वेळी पालकमंत्री विष्णू सवरा, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, जि.प. सभापती अशोक वडे, पं.स. सभापती रवींद्र पागधरे, बविआ तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सुधीर बारशिंगे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव उपस्थित होते. (वार्ताहर)