उमरोळीला मेमूचा थांबा नाही!उपनगरी सेवाकराची वसूली : तरीही हजारो प्रवाशांवर अन्याय, खासदारांनी केला अपमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:02 AM2017-10-11T02:02:26+5:302017-10-11T02:02:29+5:30
उमरोळी स्टेशन वरून प्रवास करणा-या प्रवाशांकडून उपनगरीय सेवा कर वसूल करणा-या पश्चिम रेल्वेने शटल ऐवजी नव्याने सुरू होणा-या मेमू गाडीला मात्र या स्थानकात थांबा न दिल्याने
हितेंन नाईक
पालघर : उमरोळी स्टेशन वरून प्रवास करणा-या प्रवाशांकडून उपनगरीय सेवा कर वसूल करणा-या पश्चिम रेल्वेने शटल ऐवजी नव्याने सुरू होणा-या मेमू गाडीला मात्र या स्थानकात थांबा न दिल्याने मंगळवारी शेकडो ग्रामस्थांसह डहाणू वैतरणा प्रवासी संस्थेने पालघर स्टेशन अधीक्षकांची भेट घेत थांबा देण्याची मागणी केली.
पालघर-बोईसर दरम्यानच्या उमरोळी स्टेशनची उभारणी मे २००० साली करण्यात आली. डहाणू पर्यंतच्या भागाला रेल्वेने उपनगरीय दर्जा बहाल केला आहे. त्यापोटी रेल्वे प्रशासन प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांचा उपनगरीय कर वसूल करीत आहे.मात्र प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्यात हात आखडता घेतला आहे. डहाणू-वैतरणा प्रवासी संस्था रेल्वे प्रवाशांच्या अधिकार आणि हक्कासाठी लढत असून विरार ते भरुच दरम्यान चालणारी शटल रेल्वेने बंद करून त्या जागी मेमू सुरू केल्या आहेत. तिच्या दिवसाला एकूण आठ फेºया होणार असून शटल गाड्याना उमरोळी स्टेशन वर थांबा होता तरीही मेमू गाड्यांना कमी उत्पन्न मिळत असल्याचे कारण देऊन तो उमरोळीला नाकारला आहे. त्यामुळे ह्या स्थानकातून दररोज प्रवास करणाºया ८ ते १० हजार प्रवाशांचे व शेकडो विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. त्यांना ५ ते ७ किमी चा प्रवास करून पालघर अथवा बोईसर स्थानकात जावे लागणार आहे.
प्रवासी संघटनेचे प्रथमेश प्रभू तेंडोलकर ह्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. ह्या स्थानकांमध्ये युटीएस तिकीट प्रणाली सिस्टीम सुरू करण्यात न आल्याने मध्य रेल्वे व इतर दूर पल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे उपलब्ध करून दिली नसल्याने अनेक प्रवाशांना बोईसर किंवा पालघर स्थानकात जावे लागते. पालघर जिल्हा मुख्यालय होणार असल्याने भविष्यात प्रवाशांची संख्याही वाढणार आहे.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने उमरोळी स्थानकाला ‘क’ दर्जा प्रदान करावा ह्यासाठी आज उमरोळी च्या सरपंच रश्मी पाटील, रमेश पाटील, सेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे, नागदेव पवार, शेट्टी इ. नि पालघरचे स्थानक अधीक्षक कोहली ह्यांना निवेदन दिले.
मी गाडया बंदही करू शकतो- वनगा
सोमवारी प्रवासी संस्थेचे प्रतिनिधी शिष्टमंडळासह डहाणू ते वैतरणा प्रवाशांच्या समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी पालघरचे खासदार अँड. चिंतामण वनगा ह्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात मोठ्या आशेने गेले असता.त्यांनी आहे ते मान्य करा नाहीतर आहे त्या गाडयांचे थांबेही बंद करण्याची धमकीच दिल्याचा आरोप संघटनेने केला आहे. खासदारांनी शिष्टमंडळाची एकही मागणी ऐकून घेतली नाही ‘ह्या गाड्या मी चालू केल्या आहेत आणि मी जशा गाड्या चालू करु शकतो तशा त्या बंदही करु शकतो’ अशा शेलक्या शब्दात धमकी देऊन त्याची बोळावण केल्याची पोस्ट सध्या व्हायरल झाली असून आम्ही जसे आपणाला निवडून दिले तसे पाडूही शकतो. दोन वर्षे थांबा अशा भावना व्यक्त केल्या. ह्या संदर्भात खासदार वनगा ना मोबाईल वरून अनेक वेळा संपर्क साधला असता त्यांनी कॉल स्वीकारला नाही.