शहरातील अनधिकृत बांधकामे तोडणारच; आयुक्तांचे आश्वासन
By admin | Published: November 7, 2015 12:14 AM2015-11-07T00:14:59+5:302015-11-07T00:14:59+5:30
वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचा निर्धार मनपा आयुक्त सतीश लोखंडे यांनी व्यक्त केला आहे. आपल्या कारकिर्दीत गैरप्रकारांवर बेशक
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचा निर्धार मनपा आयुक्त सतीश लोखंडे यांनी व्यक्त केला आहे. आपल्या कारकिर्दीत गैरप्रकारांवर बेशक कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही मोहीम राबवताना माझ्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव येत नसल्याचेही त्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लोखंडे यांनी महानगरपालिका कार्यालय तसेच परिसरातील अनधिकृत बांधकामे आपल्या रडारवर आणली. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांनी एक प्रकारे अधिकाऱ्यांना इशाराच दिला आहे. विविध कामांचे ठेके घेतलेल्या ठेकेदारांच्या पार्श्वभूमीची पूर्ण माहिती घेऊन कारवाई करण्याची तयारी चालवली आहे. परिसरातील अनेक अनधिकृत बांधकामांवरही हातोडा चालवला. त्यांच्या या धडक मोहिमेमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या चाळमाफियांची पळापळ सुरू झाली आहे.
महानगरपालिकेचे विस्कळीत झालेले कामकाज मी निश्चितपणे रुळांवर आणेन, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. नागरिकांचे काम ठरावीक मुदतीत केले जावे, याकडे माझा नेहमीच कल राहिला आहे. अनधिकृत बांधकामांना वीज व पाणी देणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून अशा कारवाईमुळे भविष्यात अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण येऊ शकेल, असे मला वाटते. ही कामे करताना मला वरिष्ठांचे व पदाधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे सहज शक्य होत आहे. (प्रतिनिधी)