वसईत अनधिकृत शाळा सुरूच, शिक्षणखात्याकडून कारवाई शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:17 AM2017-09-03T05:17:06+5:302017-09-03T05:17:15+5:30
वसई : शैक्षणिक वर्ष सुरू होत असतांना वसई तालुक्यातील ज्या अनधिकृत ४३ शाळांची यादी जाहिर झाली होती. त्या शाळा या शैक्षणिक वर्षांतही सर्रास सुरू आहेत. यादी जाहिर करण्यापलिकडे त्यांच्यावर ना पंचायत समितीने ना शिक्षणखात्याने काही कारवाई केली. त्यामुळे त्यांच्या चालकांनी पालकांच्या लूटीचा व विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा गोरखधंदा सुरूच ठेवला आहे. हा तपशील माहितीच्या अधिकारांतर्गत शिक्षणखात्याने दिलेल्या माहितीद्वारे उघड झाला आहे.
अनधिकृत शाळा चालवण्यात येत असतील तर त्या बंद करून संस्था चालकांवर दंड आकारून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधील कलम १८ (५) मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र, वसई पंचायत समितीतील शिक्षण विभागाकडून तालुक्यात अ़नधिकृत शाळांना पाठिशी घातले जात आहे.
शिक्षण विभाग शालेय वर्ष सुरु होण्यापूर्वी अनधिकृत शाळांची यादी जाहिर करते. त्यात पालकांनी अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करीत असते. प्रत्यक्षात मात्र कायद्यात असलेल्या तरतूदीनुसार शिक्षण विभागाने शाळा बंद करून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, जाहिर केलेली यादी सर्वसामान्य पालकांपर्यंत कधी पोचतच नाही. त्यांना कोणती शाळा अनधिकृत आहे याची माहिती नसते. त्यामुळे घराजवळ किंवा मिळेल त्या शाळेत मुलाला प्रवेश घेण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे अनधिकृत शाळांमध्ये पालक मुलांसाठी प्रवेश घेतात. अनधिकृत शाळांना नोटीसा बजावलेल्या असतांनाही त्या मुलांना प्रवेश देतात. त्यांच्याकडून डोनेशन आणि फीच्या नावाखाली वारेमाप पैसाही लुटतात. यातील बहुतांशी शाळा परप्रांतिय चालवीत आहेत. त्यावर कहर म्हणजे ख्रिस्ती संतांची नावे मिरविणाºया शाळाही परप्रांतियांकडून चालविल्या जात आहेत. कारण मिशनरी संस्थांमार्फत चालवल्या जाणाºया शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने पालक ख्रिस्ती संतांच्या नावे असलेल्या शाळांमध्येच प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यामुळे अशा शाळांचा सुळसुळाट झाल्याने त्याबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी मध्यंतरी अशा नावांच्या शाळांचा चर्चशी कुठलाही संबंध नसल्याचेही जाहिर करण्याची वेळ चर्चवर आली होती. वसई तालुक्यात सध्या ४३ शाळा अनधिकृत असल्याची माहिती शिक्षण विभागाने नगरसेवक धनंजय गावडे यांना दिली आहे. त्यावरून शालेय वर्षात या शाळा सुरु असल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. शिक्षण विभागाचा अशा शाळांवर अंकुश नसल्याने दरवर्षी अनधिकृत शाळा वाढत चालल्या आहेत. त्या बंद करून संस्था चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याचा भंग करणाºया अनधिकृत शाळा ताबडतोब बंद करून संस्था चालकांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात यावी. सध्या वसईतील हजारो विद्यार्थी अनधिकृत शाळांमध्ये शिकत आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊन शैक्षणिक प्रवाह खंडीत होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये सामावून घेण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, असेही त्यांनी शिक्षणमंत्र्यांना सुचविले आहे.
अनधिकृत शाळा...
डॉ. दि. ज. गाळवणकर इंग्रजी माध्यम शाळा, प्रार्थना हायस्कूल, लिटील एंजल्स हायस्कूल, बाबा इंग्लिश स्कूल, भावधारा अॅकॅडमी, आदित्य अॅकॅडमी, सत्यम इंग्लिश स्कूल, सिद्धीविनायक स्कूल, चेलंगी अॅकॅडमी, बी. बी. सी. हिंदी स्कूल, राजीव गांधी इंग्रजी माध्यम स्कूल, सेंट जॉन हायस्कूल, स्वामी विवेकानंद हायस्कूल, एम. के. एस. इंग्लिश स्कूल, सेंट थॉमस, इंग्लिश स्कूल, वन नेस्ट स्कूल, एफ. के. अॅकॅडमी, गुरुकुल इंग्लिश स्कूल, सनरोज इंग्लिश स्कूल, अॅम्बेसेडर इंग्लिश स्कूल, टिष्ट्वंकल लिटील स्टार्स स्कूल, मॉर्निंग स्टार स्कूल, सीताराम बाप्पा इंग्लिश स्कूल, सेंट लॉरेन्स स्कूल, आदर्श कलावती विद्यामंदिर, मारुती विद्यामंदिर, राजीव गांधी मेमोरीअल स्कूल, फर्स्ट स्टेप स्कूल, महात्मा फुले स्कूल, होरायझन इंग्लिश अॅकॅडमी, प्रजापती स्कूल, किंगार इंग्लिश स्कूल, प्रथमेश पब्लिक स्कूल, पिरॅमिड स्कूल, ट्रँगल अॅकॅडमी हायस्कूल (इंग्लिश व हिंदी माध्यम), न्यू लिटील स्टार स्कूल, वाय. के. पाटील हायस्कूल, सिद्धीविनायक शाळा, ट्रँगल हायस्कूल, दिशा अॅकॅडमी, सूर्योदय बाल विद्यामंदिर इंग्रजी माध्यम, सूर्योदय बाल विद्यामंदिर हिंदी माध्यम, रामकृष्ण स्कूल इंग्रजी माध्यम.