अनधिकृत कोळंबी प्रकल्प उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:24 AM2021-02-11T00:24:49+5:302021-02-11T00:25:02+5:30
वसईतील भुईगाव येथे महसूल व पालिका प्रशासनाची कारवाई
वसई : भुईगाव खारटन भागातील पाणथळ जमिनीत अनधिकृतपणे उभारलेले कोळंबी प्रकल्प व चाळी कोकण आयुक्त यांच्या आदेशाने बुधवारी निष्कासित करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती याचिकाकर्ते तथा पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली.
शासनाने अनधिकृत प्रकल्पांवर कारवाईसाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्यानंतर कोकण आयुक्त यांच्या आदेशानुसार तोडू कारवाईचे आदेश वसई महसूल व महापालिका प्रशासनास दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळीच या कारवाईस सुरुवात झाली. यामध्ये वसई महसूल विभागाचे प्रांत, तहसीलदार आणि वसई-विरार महापालिका प्रशासन यांचे उपायुक्त व नगररचना विभाग तसेच पोलीस कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कारवाईसाठी २०० पेक्षा जास्त पोलीस ताफा, ३० बुलडोझर, ट्रॅक्टर, अग्निशमन दल आदी मोठा फौजफाटा कारवाईच्या ठिकाणी सज्ज झाला होता. पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक, फ्रान्सिस डिसोझा, मॅकेन्झी डाबरे व पर्यावरण संवर्धन समिती यांनी कारवाईसाठी मागणी केली होती.
पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वसईच्या पश्चिम पट्ट्यातील पाणथळ जागा व कांदळवने वाचावी म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. मा. मुंबई उच्च न्यायालयात वनशक्ती संस्थेच्या माध्यमातून दाखल जनहित याचिकेवरील आदेशानुसार ही निष्कासन कारवाई होत आहे. या कारवाईचे आम्ही पर्यावरणप्रेमी म्हणून स्वागत करीत आहोत.
- समीर वर्तक, पर्यावरण संवर्धन समिती समन्वयक, वसई