कुरगावमधील गाळे अनधिकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 07:04 AM2018-12-16T07:04:56+5:302018-12-16T07:05:28+5:30
ग्रामपंचायतीवर ठपका : पालघर तहसीलदारांची भूमिका ठरणार महत्वाची
बोईसर : पालघर तालुक्यातील कुरगाव ग्रामपंचायतीने पाचमार्ग नाक्यावर मार्केटसाठी गाळे बांधताना संबंधित खात्याची परवानगी न घेतल्याने ते अनिधकृत असल्याचे पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सुनावणीनंतर निर्णय दिला आहे.
गाळे बांधण्यात आलेली जागा ही आता महाराष्ट्र शासनाच्या नावे असली तरी १९५४ साली ग्रामपंचायतीच्या नावे होती. त्यामुळे तहसीलदारांची भूमीका महत्वाची ठरणार आहे. कुरगांव ग्रामपंचायतीने सर्व्हेे नंबर १७९ मध्ये वर्ष १९८९-९० साली बांधलेल्या अकरा गाळ्यांबाबतची तक्रार तारापूरचे पंचायत समिती सदस्य सुशिल चुरी यांनी २९ सप्टेंबर २०१८ च्या मासिक सर्वसाधारण सभेत उपस्थित केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती स्तरावर संबंधिताची सुनावणी घेऊन निर्णय दिला आहे.
गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिलेल्या निर्णयामध्ये ते बांधकाम करतेवेळी जागेची खातरजमा करणे आवश्यक होते. मात्र, सध्या स्थितीत जागेबाबत तक्रार उपस्थित झाल्यानंतर ती जागा ही महाराष्ट्र शासनाच्या नावे आढळून आली आहे. गाळ्याचे बांधकाम करीत असताना संबंधित खात्याची परवानगी घेऊन बांधकाम करणे आवश्यक होते तसेच, सर्व संबंधितांची जागेची मालकीची खातरजमा करणेही गरजेचे होते. त्यामुळे सदर चे बांधकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे नमूद केले आहे. मात्र, तरी शासन निर्णय महसूल व वनविभाग यांचे शासन परिपत्रक क्र मांक जमीन ०३/ २००९/ प्र क्र /१३/ डज - १/ दिनांक ७ सप्टेंबर , २०१० तसेच महसूल व वन विभाग यांचे शासन परिपत्रक क्र मांक जमिन ०७/२०१३/ प्रक्र ३७३ / प १/ दिनांक १० आॅक्टोंबर, २०१३ नुसार व सरपंच, ग्रामपंचायत कुरगांव यांनी यापूर्वी केलेला पत्रव्यवहार याबाबतीत तहसीलदार पालघर यांना त्यांचे स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे तहसिलदार या संदर्भात काय भूमिका घेतात त्याकडे कुरगांव वासीयांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार गाळे बांधकाम करण्यात आले आहेत. रितसर लिलाव पद्धतीने भाडेतत्वार ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने देण्यात आलेले आहेत. मार्केट गाळ्यांचे बांधकाम केलेल्या जागा १९५४ पासून कुरगांव ग्रामपंचायतीच्या ताब्यात होती. त्यानंतर ती महसूल विभागाने ताब्यात घेतल्याने त्यावरील बांधकाम व सदरची जागा ग्रामपंचायती कडे हस्तांतरीत होण्यासाठी महसुल विभागाकडे मागणी केली आहे.
-मयुर पाटील, ग्रामसेवक, कुरगांव ग्रामपंचायत
शासकीय योजनांच्या निधीचा गैरवापर करून परवानगी न घेता गाळे बांधण्यात आले असून बांधलेल्या गाळ्यापैकी एकही गाळा गोरगरिबांना देण्यात आला नाही, याबाबत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
-सुशील चुरी,
सदस्य, पंचायत समिती पालघर