काका, पुतण्या साकळतोडी नदीच्या पुरात गेले वाहून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 07:57 PM2019-07-02T19:57:36+5:302019-07-02T19:57:42+5:30
जव्हार तालुक्यातील दाभालोन पैकी गुंजुंनपाडा येथील काका पुतण्या नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना सोमवार 01 जुलै 2019 रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे.
जव्हार: सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेल्या जव्हार तालुक्यातील दाभालोन पैकी गुंजुंनपाडा येथील काका पुतण्या नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना सोमवार 01 जुलै 2019 रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. दाभालोन पैकी गुंजुंनपाड्यातील जाना सोनू उंबरसाडा- ६० आणि त्याचा पुतण्या, काकड बाबन उंबरसाडा- ४० हे दोघेही सोमावरी झालेल्या मुसळधार पावसामुळे गावाजवळील साकळतोडी नदीत वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांचे मृतदेह मंगळवारी जवळपास १३ किमी अंतरावर सापडले आहेत. त्यांची अपघातग्रस्त नोंद जव्हार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
घटनेचे वृत्त असे की, सोमवारी धो- धो कोसळणा-या मुसळधार पावसामुळे नदी तुडुंब भरून वाहू लागली. त्यावेळी जाना शेताकडे गेला होता. परंतु तो पुरात वाहून गेल्याचे त्याचा पुतण्या, काकड बाबन उंबरसाडा ह्याला समजलं. त्यानंतर त्याने काकाला शोधण्यासाठी नदीकडे धाव घेतली. काका कुठे अडकला असेल तर वाचवू त्याला, मात्र काकाला शोधत असताना तोही पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
--------------------
काका पुतण्या हे दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्या दोघांच्या कुटुंबावर मोठे दुःखाचे संकट कोसळले असून, त्या दाभालोन पैकी गुंजुंनपाड्यावर शोककळा पसरली आहे. त्या दोघांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देऊ असे आदिवासी आघाडी अध्यक्ष हरिश्चंद्र भोये यांनी सांगितले. तसेच त्यांनी त्या आपत्तीग्रस्त दोघा कुटुंबांना भेट देऊन सांत्वन केले.