२१ कोटी देऊनही परेकडून असुविधाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 03:16 AM2018-09-09T03:16:29+5:302018-09-09T03:16:39+5:30
मुंबई महानगरपालिकेने पश्चिम रेल्वेला गेल्या तीन वर्षांत प्रवाशांच्या सुखसोयीसाठी करोडो रुपये देऊनही प्रवासी सोयीसुविधांपासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे.
नालासोपारा : मुंबई महानगरपालिकेने पश्चिम रेल्वेला गेल्या तीन वर्षांत प्रवाशांच्या सुखसोयीसाठी करोडो रुपये देऊनही प्रवासी सोयीसुविधांपासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत, शिवसेनेचे माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी रेल्वेला पत्रव्यवहार करून माहिती मागवली असता, सदर बाब समोर आली आहे.
पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई महानगरपालिकेने विविध विकासकामांसाठी गेल्या तीन वर्षांत तब्बल २१ कोटी सहा लाख रुपये दिले असल्याची माहिती चोरघे यांना रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रकाश चांडल यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेचे पश्चिम रेल्वेला गटारे साफसफाई, रेल्वेस्थानक परिसरात स्वच्छता, पादचारी पूल बांधणी व दुरुस्त करणे, ट्रॅकच्या बाजूला कल्व्हर्ट बांधणे व रुंदीकरण करणे, आदी कामांसाठी २१ कोटी सहा लाख रुपये देण्यात आले होते. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर बूटपॉलीश करणाºयांकडूनही वर्षाला ११ लाख रुपये मिळत असल्याची माहितीमध्ये उघड झाले आहे. तसेच प्रवासी उत्पन्न, जाहिराती, वाणिज्य आस्थापना, केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा निधी, मालवाहतुकीचे उत्पन्न, चित्रपटाच्या चित्रीकरणातून करोडो रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, रेल्वे प्रशासन प्रवाशांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप चोरघे यांनी केला आहे.