मोदींच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी साधला डहाणूत शेतकऱ्यांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 03:05 PM2019-09-17T15:05:08+5:302019-09-17T15:08:54+5:30
कोसबाड हिल येथे आयोजित कार्यक्रमापूर्वी त्यांनी या कृषी विज्ञान केंद्रातील विविध उपक्रम आणि प्रयोगशाळेची पाहणी केली.
अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी - महाराष्ट्रातील पहिल्या कृषी विज्ञान केंद्रात पंतप्रधानांचा वाढदिवस शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून साजरा करणे हा आजपर्यंतचा अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (कृषी व किसान कल्याण विभाग) पुरुषोत्तम रुपाला यांनी कोसबाड येथे केले आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवशी आयोजित किसान गोष्टी या विशेष कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोदी यांच्या सहवासातील आठवणी आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
कोसबाड हिल येथे आयोजित कार्यक्रमापूर्वी त्यांनी या कृषी विज्ञान केंद्रातील विविध उपक्रम आणि प्रयोगशाळेची पाहणी केली. त्यांच्या हस्ते औषधी वनस्पतींचे रोपण झाल्यानंतर सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या सामूहिक शुभेच्छा दिल्या. ते यादिवशी पुष्पगुच्छही न स्वीकारता आईचा आशीर्वाद घेऊन थेट कामाला सुरुवात करतात या त्यांच्या कार्यपद्धती विषयी त्यांनी माहिती दिली. आपल्या विद्यार्थी दशेतील अनुभव कथन करताना त्यांनी सांगितले की, त्यावेळी अन्नधान्य दुष्काळाचा सामना करावा लागला होता, सर्वांची ही गरज पूर्ण व्हावी म्हणून देशभर प्रत्येक सोमवारी उपवास केला पाहिजे असे आवाहन तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी केल्यानंतर देशवासियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याच प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि वृक्षारोपण कार्यक्रमालाही संपुर्ण देशातून प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. या जिल्ह्यात चिकू बागायती संकटात असल्याचे निवेदन उत्पादकांनी दिले असून हा प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
प्रत्येकाने रोपं लागवड करताना ते टॅग करावे हे सांगताना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. मोदींनी बहुतेक योजना पूर्णत्वास आणल्या आहेत. केंद्र सरकारच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे ही खूपच मोठी गोष्ट असून महाराष्ट्र सरकारही हे उत्तमरीत्या करीत आहे. देशात 25 लक्ष ग्रामपंचायती असून त्यांना 2 लाख करोडचा निधी केंद्रशासनाकडून दिला जातो, तर गावातील प्रतिलाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रतिवर्षी 488 रुपये जमा होतात. वीज, पाणी, गॅस हे शेवटच्या घटकांपर्यंत मिळाले पाहिजे याकरिता मोदी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.