आदिवासी कला, संस्कृतीचे अनोखे दर्शन
By admin | Published: November 28, 2015 10:29 PM2015-11-28T22:29:00+5:302015-11-28T22:29:00+5:30
डहाणू तालुक्यातील मुरबाड येथे श्री गावदेवी मंडळ मुरबाड व बहुजन विकास आघाडी यांच्यातर्फे आदिवासी कला आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे परिसरातील
कासा : डहाणू तालुक्यातील मुरबाड येथे श्री गावदेवी मंडळ मुरबाड व बहुजन विकास आघाडी यांच्यातर्फे आदिवासी कला आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे परिसरातील आदिवासी तरूणांनी विविध कला व नृत्य सादर करून आदिवासी कलेचे दर्शन घडवून उपस्थित प्रेक्षकांना भारावून टाकले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
आदिवासी तरूणांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यातुन नावारुपाला येणारे कलाकार घडावेत आणि आदिवासींची कला व संस्कृतीची जोपासना होवून समाजातील इतर लोकांपर्यंत पोहोचवावी या मुख्य उद्देशाने बहुजन विकास आघाडी व मुरबाडच्या श्री गावदेवी मंडळातर्फे झालेल्या या कार्यक्रमात आदिवासी तरूणांनी मोठ्या संख्येने भाग घेवून प्रतिसाद दिला. डहाणू, वाणगांव, कासा परिसरातून कला पथके, नृत्य कलाकार सहभागी झाले होते. यावेळी आदिवासींनी तारपा नृत्य, कांबड्या नृत्य, टिपरी नृत्य, ढोलनाच, घोरनाच असे एकापेक्षा एक दर्जेदार नृत्य सादर केली. कधीही न बघितलेले डान्स, नृत्याचे प्रकार पाहून सर्व कलाकारांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले व सहभागी कलाकारांना प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आ. मनिषा निमकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. विलास तरे, प्रमुख पाहुणे माजी खा. बळीराम जाधव, नगरसेवक रमेश घोरकाना, राजेश पाटील तर विशेष अतिथी चित्रपट अभिनेते रणजित हेमंत बिर्जे, गुरू बचन सिंग या वेळी उपस्थित होते. कलाकारांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यासाठी रफिक घाची, किशोर बरड, अरूण निकोले, चंदू घाटाळ, सुंदर मोर आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)