अज्ञात व्यक्तीने चावा घेऊन तोडले कान
By admin | Published: January 23, 2016 11:29 PM2016-01-23T23:29:02+5:302016-01-23T23:29:02+5:30
आपल्या शेतात भाजीपाला काढत असलेले चंद्रकांत गोरेकर (५५) रा. कमारे वावेपाडा यांनी आपल्या शेतातून पळणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला पकडून हटकले असता त्याचा राग येऊन
पालघर : आपल्या शेतात भाजीपाला काढत असलेले चंद्रकांत गोरेकर (५५) रा. कमारे वावेपाडा यांनी आपल्या शेतातून पळणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला पकडून हटकले असता त्याचा राग येऊन त्यानी शेतकऱ्यांच्या कानाला चावा घेऊन कान डोक्यापासून वेगळा केला. पोलीसांनी या अज्ञाताला ताब्यात घेऊन उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात नेले असता आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.
पालघरच्या पूर्वभागातील कमारे येथील आपल्या शेतात शुक्रवारी संध्याकाळी शेतकरी गोरेकर मेथी, पातीकांदा इ. भाजीपाला काढत असताना शेतात लावलेल्या भाजीपाल्यावरून तो अज्ञात इसम धावत जात असताना त्या शेतकऱ्याने त्याला पकडून हटकले. त्यामुळे त्या अज्ञात ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीने शेतकऱ्याला खाली पाडून त्याच्या डाव्या कानाला जोरदार चावा घेतला. त्याचा कान डोक्यापासून वेगळा केल्यानंतर त्याने धुम ठोकली. रक्तबंबाळ अवस्थेत शेतकऱ्याला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले तर कमारे येथील नागरीकांनी त्या अज्ञात व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने नागरीकांवर दगडांचा वर्षाव केला. परंतु नागरीकांनी त्याला पकडून पोलीसांच्या हवाली केले. त्याला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात नेले असताना त्याचा शनिवारी सकाळी अचानकपणे मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
मनोरुग्ण असल्याचा तर्क
या प्रकरणी पालघर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश दुम्पल पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्या रूग्णाच्या पोस्टमार्टमदरम्यान त्याचे लिव्हर खराब होऊन त्याला टी. बी चा आजार असावा अथवा त्याला अंमली पदार्थांचे व्यसन असल्याने वेडापिसा झालेला. त्या मनोरूग्ण व्यक्तीने हे कृत्य केले असावे असा तर्क व्यक्त केला. तसेच त्याला काल रात्री ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठविण्याची प्रक्रिया सुरू असतानाच त्याचा आज सकाळी अचानक मृत्यू झाल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.