तहसील कार्यालयासमोर आज अनोखे होळी आंदोलन
By admin | Published: March 10, 2017 03:32 AM2017-03-10T03:32:52+5:302017-03-10T03:32:52+5:30
डिसेंबर २०१६ पासून फेब्रुवारी २०१७ या कालावधीत रोहयो वर काम करून घाम गाळलेल्या मजुरांना अजुन मजुरी मिळालेली नाही. अधिकारी वर्गाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे
वाडा/ विक्रमगड/ जव्हार/मोखाडा : डिसेंबर २०१६ पासून फेब्रुवारी २०१७ या कालावधीत रोहयो वर काम करून घाम गाळलेल्या मजुरांना अजुन मजुरी मिळालेली नाही. अधिकारी वर्गाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे या मजुरांवर ऐन सणासुदी उपासमारीची वेळ आली आहे. ऐन होळीच्या सणाच्या तोंडावर मजुरांना पैसे आदिवासी मजुरांवर सरकार आणि प्रशासन अन्याय करत आहे. याबाबत श्रमजीवी संघटना आता आक्र मक झाली असून येत्या १० मार्च रोज पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्र मगड, जव्हार इत्यादी तहसील कचेऱ्या बंद पाडून कार्यालयासमोर छोटी (बारकी) होळी पेटवून सरकारचा निषेध कणार आहे.
या भागात कुपोषण नसून रोजगार हमी योजना देखील प्रभावी आहे असे ठासून सांगणाऱ्या सरकारच्या कार्यपद्धतीचे पार धिंडवडे निघाले आहेत. पालघर जिल्ह्यात गेले चार महिने मजुरांच्या घामाचे कष्टाचे पैसे सरकार देत नसल्याने हे सरकार भिकारडे सरकार असल्याचा गंभीर आरोप श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आला आहे. एकीकडे काम देऊन मजुरी देत नाही तर दुसरीकडे कामाची मागणी करूनही काम मिळत नाही. एकट्या विक्र मगड तालूक्यात ७५५ मजुरांनी कामाची मागणी केलेली मात्र त्यांना काम देण्यात प्रशासन अकार्यक्षम ठरले. या मजूरांनी अखेर बेकार भत्याची मागणी केली आहे. शासन आणि प्रशासनाच्या या बेजबाबदार धोरणामुळे येथील मजुरांवर सद्यस्थितीत अक्षरश: उपासमार ओढवली आहे. (वार्ताहर)
राज्य सरकारला पोस्त म्हणून कोंबडी
श्रमजीवी संघटनेने याबाबत अनेक पत्र अर्ज विनंत्या करून देखील प्रशासन आपली कार्यपद्धती बदलत नाही. १० मार्च रोजी होणाऱ्या या अन्याया विरोधात तहसील कार्यालयांसमोर होळी पेटवली जाणार आहे. आदिवासी समाजात होळी या सणाला फार महत्व आहे. समाजातील अनिष्ट प्रथा, वाईट रूढी आणि इडा- पीडा या होळीत भस्म व्हावी अशी मानिसकता आहे, म्हणूनच सरकार ला सुबुद्धी मिळावी आणि याभागातील भ्रष्टाचार, अपहार गैर कारभार, या भागातील गरिबांची भूक, आदिवासीबाबतची सरकारची असंवेदनशिलता या वाईट गोष्टी या होळीत भस्म व्हाव्यात या मागणीसाठी हे अभिनव आंदोलन करून येथील मजूर आदिवासी परंपरेप्रमाणे शासनाला आणि राज्य सरकारला कोंबडी पोस्त (भेट) म्हणून देणार आहेत. यासाठी प्रत्येक तहसील कचेरीत हजारो मजूर सहभागी होणार आहेत.