डबल मास्क वापरा; कोरोनाबाधा टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 11:35 PM2021-05-04T23:35:34+5:302021-05-04T23:35:43+5:30
धोका ९५ टक्केने होतो कमी : श्वास घेण्यात अडथळा असल्याचा दावा
जगदीश भोवड
पालघर : डबल मास्क वापरल्याने कोरोनाचा धोका ९५ टक्के कमी होतो, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना संसर्ग होण्याची शक्यता हवेतून अधिक आहे, असे आता दिसून आले आहे. त्यामुळे केवळ एक मास्क न घालता दुहेरी मास्कचा वापर हा अत्यंत प्रभावी ठरू शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र त्याच वेळी श्वास घेण्यास अडथळा येण्याची शक्यताही अन्य डॉक्टरांकडून वर्तवली जात आहे.
१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्यास परवानगी मिळालेली आहे. मात्र लशींची उपलब्धता अजूनही पुरेशा प्रमाणात झालेली नाही. हा पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत दुहेरी मास्क घालणे फायदेशीर आहे. आधी साधा थ्री फाय मास्क वापरून त्यावर कपड्याचा मास्क लावावा त्यामुळे जवळपास ९५ टक्के संरक्षण मिळते. या मास्कचा वापर लसीकरणाइतकाच प्रभावी आहे. कोरोना चाचण्या करणारे अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या मास्कमुळे निश्चित संरक्षण मिळाले आहे.
आपल्याला कोविड होऊन गेला असेल, वा नसेल, शरीरामध्ये अँटिबॉडी असेल वा नसेल, तरीही दुहेरी मास्क वापरणे हे अधिक फायदेशीर आहे. अनेकदा आपल्याला गर्दीत जावे लागते. अशा वेळी दुहेरी मास्कमुळे निश्चित संरक्षण मिळते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असल्यामुळे दुहेरी मास्कचा वापर करावा, असे मुंबईस्थित जगप्रसिद्ध डॉ. शशांक जोशी यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनोर येथील डॉक्टर
आदित्य सातवी यांनी मात्र यामुळे श्वास घेण्यास अडथळा येऊ शकतो, असे सांगितले.
कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हाच पर्याय
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. कोरोनावर आता प्रतिबंधक लस आलेली आहे, लस घेणे आवश्यक आहे. मात्र तरीही कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हाच उत्तम पर्याय आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. प्रत्येकाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करायलाच हवा. मास्क दुहेरी असेल तर त्याचा प्रत्येकाला फायदा होऊ शकतो.
डॉ. शशांक जोशी यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दुहेरी मास्क अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आधी साधा थ्री फाय मास्क वापरून त्यावर कपड्याचा मास्क लावावा, त्यामुळे जवळपास ९५ टक्के संरक्षण मिळते. या मास्कचा वापर लसीकरणाइतकाच प्रभावी आहे. कोरोना चाचण्या करणारे अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या मास्कमुळे निश्चित संरक्षण मिळाले आहे.
हे करा, हे करू नका
प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे, सॅनिटायझर करणे, सामाजिक अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ही त्रिसूत्री अत्यंत आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. काही कारणानिमित्त जावेच लागले तर कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष होणार नाही हे पाहावे. एखादी व्यक्ती खोकत असेल तर तिच्याजवळ जाऊ नये.
एकावर एक दोन मास्क वापरले तर श्वास घेण्यास त्रास होणार. तसेच शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणार. ऑक्सिजन पुरेपूर भेटला नाही तर कमजोरी येऊन आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा एन-९५ मास्क हे उत्तम आहे. सरकारनेही त्यास परवानगी दिली आहे. त्याच्या वापराने कोणताही त्रास होत नाही.
- डॉ. आदित्य सातवी, मनोर