लहान आसांच्या जाळ्यांचा वापर केल्याने पापलेटचे अस्तित्व धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:25 AM2018-11-23T00:25:58+5:302018-11-23T00:26:12+5:30
वसई ते बोर्डीदरम्यानच्या जिल्ह्यातील ११० किमी किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पापलेटची मासेमारी केली जात असून सातपाटी हे बंदर त्यासाठी प्रसिद्ध आहे.
- हितेन नाईक/अनिरु द्ध पाटील।
पालघर/बोर्डी : कव पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटधारकांकडून मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत लहान पापलेटच्या पिल्लांची मोठ्या प्रमाणात केलेली मासेमारी आणि लहान आसांच्या जाळ्यांचा अतिवापर केल्याने मच्छीमारांना सर्वात जास्त आर्थिक उत्पन्न देणा-या पापलेटचे अस्तित्व धोक्यात सापडले आहे. त्यामुळे बाजारात पापलेट मिळेनासा झाला आहे.
वसई ते बोर्डीदरम्यानच्या जिल्ह्यातील ११० किमी किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पापलेटची मासेमारी केली जात असून सातपाटी हे बंदर त्यासाठी प्रसिद्ध आहे. पालघर आणि डहाणू तालुक्यातील बहुतांश मच्छिमार हे दालदा (गिलनेट) या पारंपरिक पद्धतीने पाण्याच्या प्रवाहासोबत जाळे टाकून त्यात अडकणारे पापलेट आदी मासे पकडतात. वसई, उत्तन येथील मच्छिमार करल्या डोली या समुद्रात खुंट रोवून त्याला डोल जाळे लावून त्याद्वारे पापलेट आदी मासे पकडतात. डोल नेट जाळ्यांचा आस हा शेपटीकडे हळूहळू कमी होत जात असल्याने या जाळ्यात लहान पापलेट आदी माशांच्या लहान पिल्लांची मरतुक होते. दालदा या जाळ्यांचा आस हा ५ इंचापर्यंत असल्याने या जाळ्यात लहान पापलेट आदी माशांची मरतूक नगण्य प्रमाणात होते.
सप्टेंबर ते डिसेंबर हा पापलेटचा प्रजननाचा काळ असतो. या माशांनी टाकलेल्या अंड्यानंतर ५० ग्रॅम ते २०० ग्रॅमपर्यंत वाढ झालेल्या पापलेटच्या पिल्लांची बेसुमार मासेमारी एप्रिल, मे या दोन महिन्यात करल्या डोल जाळ््याने केली जाते. पैशाच्या अतीहव्यासापोटी काही मच्छिमार पापलेट माशाची पुरेशी वाढ होऊ न देताच त्यांना आपल्या जाळ््यात पकडत असल्याने पापलेट माशाचे अस्तित्व आता संपण्याच्या मार्गावर आहे.
वसई ते थेट गुजरातच्या हद्दीपर्यंतचा समुद्रातील भाग हा मासेमारीचा गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील किनारपट्टीवर सुमारे २ ते ३ हजार लहान मोठ्या बोटींद्वारे मासेमारी केली जाते. वसई-उत्तन भागातील अनेक बोट मालकांनी समुद्रात कोरे, एडवन ते थेट जाफराबादपर्यंत समुद्रात कवी मारल्याने सध्या पालघर-डहाणू विरु द्ध वसई-उत्तन मच्छिमारांचा मासेमारी क्षेत्राच्या हद्दीचा वाद मागील अनेक वर्षांपासून आहे. या वादावर कुठलाही निर्णय शासन दरबारी होत नसल्याने दोन्ही भागातील मच्छीमारांमध्ये अधूनमधून संघर्षाच्या घटना घडत आहेत. वसई-उत्तनमधील एका मच्छीमारांच्या १५ ते २० कवी समुद्रात उभारल्या गेल्या असल्याने समुद्रात हजारो कवींचे अतिक्र मण झाले आहे. त्यामुळे पालघर-डहाणू भागातील मच्छीमारांना आपली जाळी मारण्यासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याचे मच्छिमार नेते सुभाष तामोरे यांनी लोकमतला सांगितले. मच्छिमारांनी आपली सर्व जाळी समुद्रात टाकल्यानंतर ही जाळी कवींच्या खुंटामध्ये गुंतून मच्छीमारांचे लाखो रु पयांचे नुकसान होते. सध्या मासळीचे अत्यल्प प्रमाण पाहता हे नुकसान सहन करण्याची मानिसकता नसल्याने मच्छीमारांना नुकसान सहन करून रिकाम्या हाताने बंदरात परत यावे लागत असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले. त्यामुळे बाजारात पापलेटची आवक घटली आहे.
कव पद्धतीच्या मासेमारीमुळे पापलेट मासे पकडण्याकरिता जाळी टाकण्यास समुद्रात जागाच उरलेली नाही. याकरिता स्थानिक मच्छिमार गुजरातच्या समुद्राकडे वळले आहेत. मात्र तेथे सुपर आकारातील पापलेट मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत. डहाणू आणि झाईच्या खोल समुद्रात दर्जेदार पापलेट मिळू शकतात. मात्र कव पद्धतीच्या मासेमारीमुळे स्थानिकांच्या जाळ्यांचे नुकसान होत असल्याने हा धोका पत्करण्यास कुणी धजावत नाही.
- सुरेश दवणे, सेक्रेटरी, झाई मांगेला समाज
मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित