विहिर बांधण्यासाठी दगडी चुरीचा वापर, डहाणूतील झारली या आदिवासी गावातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 12:24 AM2019-05-09T00:24:55+5:302019-05-09T00:26:15+5:30
या तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या साधी विहीर नूतनीकरणातून चोवीस विहिरींचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
- अनिरु द्ध पाटील
डहाणू/बोर्डी : या तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या साधी विहीर नूतनीकरणातून चोवीस विहिरींचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र वाकी ग्रामपंचायती अंतर्गत झारली प्रभूपाडा येथे बांधकामात रेतीऐवजी दगडाची पावडर वापरल्याने हे बांधकाम थांबविण्यासह कारवाईबाबतचे लेखी निवेदन ग्रामस्थांनी प्रशासनाला दिले. ठेकेदाराकडून अशी फसवणूक होत असल्यास योजना राबविण्याचे फलीत काय? हा प्रश्न उपस्थित करून दोषींविरु द्ध कारवाईची मागणी केली आहे.
या योजनेतील विहिरीचे बांधकाम झारलीतील प्रभूपाड्यावर सुरू असताना, ठेकेदाराकडून बांधकामात रेती ऐवजी दगडाची पावडर वापरली जात असल्याने ते तत्काळ थांबविण्याकरिता लेखी निवेदन दिले. ही केवळ आदिवासींची नव्हे तर शासनाचीही फसवणूक असल्याने कठोर कारवाईची मागणी त्याद्वारे एप्रिल महिन्यात करण्यात आली. पंचायत समतिीच्या पाणी पुरवठा विभागाचे विभागीय उप अभियंता आर. ए. पाटील आणि त्यांच्या कर्मचायांनी सुरुवातीला याकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले..मात्र पुढे कारवाई केली नाही. या विरु द्ध स्थानिक पेटून उठल्याचे कळताच ठेकेदारांनी तत्काळ रेती आणून बांधकाम सुरू केले.
त्याने झारली झोपपाडा येथे बांधलेल्या विहिरीकरिता हीच पद्धत वापरल्याचे सांगून, लगतच्या छोट्या ओहळातून स्वत: करिता काढलेली रेती त्या ठेकेदाराने वापरून त्याचे पैसेही दिले नसल्याचा आरोप स्थानिक आदिवासीने केला आहे. तर बांधकामाकरिता रेती ऐवजी सॅन्ड क्र श वापरता येत असली तरी पावडर वापरणे नियमाला धरून नसल्याची माहिती बांधकाम व्यवसायातील तज्ज्ञांनी दिली. त्यामुळे या योजनेतून बांधण्यात आलेल्या सर्व विहिरींची चौकशी होणे अपेक्षित आहे.
त्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची कामगिरी तपासा
डहाणू आणि तलासरी या दोन्ही पंचायत समितिच्या पाणी पुरवठा विभागाच्या, विभागीय उपअभियंता पदी आर. ए. पाटील हे होते. झारलीतील या प्रश्नाबाबत त्यांना कळविण्यात आले. पाहणी करून काम थांबवू असं त्यांनी सांगितलं, मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. 30 एप्रिलला ते सेवानिवृत्त झाले, आय अॅम नॉट आन्सरेबल टू यू म्हणून त्यानी बोलणं थांबविले.
कशी बांधली जाते विहीर : डहाणूत रेतीच्या रॉयल्टीला बंदी असल्यामुळे काही ठेकेदाराकडून सर्रास दगडाच्या पावडरचा वापर केला जातो. विहिरींच्या पायापासून अर्धेअधिक बांधकाम रेतीएवजी दगडाच्या पावडरच्या सहायाने करून वरच्या भागात रेतीचा वापर होतो. अंतिम पाहणी दरम्यान विहिरीत उतरून तपासणी होत नसल्याने बांधकामा वेळी या विभागाच्या अभियंत्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जाते का? त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेची जबाबदारी असलेल्या जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि गटविकास अधिकार्यांनी याकडे गांभीर्याने पाहावे.
तालुक्यात या योजनेतील चोवीस विहिरी
गावांची नावं : पाडेनिहाय
धुंदलवाडी: धोडीपाडा, बाजारपाडा
करंजविरा: कोमपाडा, पाटीलपाडा
हळदपाडा: मुंडोलपाडा, रांधवानपाडा
गडचिंचले: हेदपाडा, पाटीलपाडा
कळमदेवी: लहानगेपाडा,कारभारीपाडा
मुरबाड: पागीपाडा
धरमपूर: खिंडीपाडा, डोंगरकरपाडा
निंबापूर: मोहूपाडा
धामणगाव: खोरीपाडा, चिखलीपाडा
कोटबी: पाटीलपाडा 1 आणि
चरी: केलईपाडा, मेघदेवपाडा
खानीव: पाटीलपाडा, सवरपाडा
झारली: प्रभूपाडा, झोपपाडा
काय मागणी केली
विहिरीचे टिकाऊ बांधकाम अपेक्षित असताना ठेकेदाराकडून फसवणूक झाल्याने अन्य ठेकेदाराची नेमणूक करावी. शिवाय तालुक्यात या योजनेतून राबविण्यात आलेल्या सर्वच विहिरींच्या बांधकामांची चौकाशी आयआयटी(पवई) तर्फे करावी,
या विकासकामात ठेकेदाराने फसवणूक केल्याची तक्र ार ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली. मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. या पद्धतीचं बांधकाम किमान 20 वर्ष मजबूत राहील तसा बॉंड लिहून देतो असं ठेकेदार म्हणतो. शिवाय तक्र ार मागे घेण्याबाबत सतत संपर्क साधला जातोय. मात्र आम्ही निर्णयावर ठाम आहोत. जिल्हाधिकारी याकडे लक्ष घालतील का?
- नारायण पटलारी, ग्रामस्थ, झारली
नळ पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता एप्रिल अखेर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी रुजू झालेल्या अभियंत्याकडून माहिती घेऊन कार्यवाही होईल.’’
- बी.एच.भरक्षे,
गटविकास अधिकारी,
डहाणू पंचायत समिती