उत्तन, वसईचे नाखवा दर्यावर !
By admin | Published: August 6, 2015 02:50 AM2015-08-06T02:50:01+5:302015-08-06T02:50:01+5:30
समुद्रातील वादळी वारे व तुफानी लाटांच्या पार्श्वभूमीवर पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील मच्छीमारांनी ११ आॅगस्टनंतर समुद्रात मासेमारीला जाण्याचे
पालघर : समुद्रातील वादळी वारे व तुफानी लाटांच्या पार्श्वभूमीवर पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील मच्छीमारांनी ११ आॅगस्टनंतर समुद्रात मासेमारीला जाण्याचे एकमताने ठरविले होते. मात्र, अधिक मासे मिळण्याच्या हव्यासापोटी उत्तन, वसई भागातील काही मच्छीमारांच्या बोटींनी समुद्रात बोटी उतरविल्याने सातपाटी, मुरबे, डहाणू भागातील काही मच्छीमारांनी मासेमारीला जाण्यासाठी घेतलेले पास, परवाने देण्यासाठी संस्थांकडे तगादा लावला आहे.
केंद्र व राज्य शासनाने घोषित केलेली १ जून ते ३१ जुलैपर्यंतची पावसाळी मासेमारीबंदी उलटल्यानंतर कस्टम विभागाने मासेमारीला जाण्यासाठी परवाने जारी केले आहेत. परंतु, समुद्रात अजूनही वादळी वारे व तुफानी लाटा उसळत असल्याने पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील सहकारी संस्थांनी एकमताने ११ आॅगस्टनंतर मासेमारीला जाण्याचा निर्णय घेतल्याचे काही मच्छीमार प्रतिनिधींनी जाहीर केले होते.
परंतु, मच्छीमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्था या सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थांनी डिझेल, बर्फ वितरण बंद करून पासेस देण्यास नकार दिल्याचे राजन तरे या मच्छीमाराने लोकमतला सांगितले. गेल्या वर्षी मासेमारी उत्पादन कमी झाल्याने अनेक मच्छीमार कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. समुदातील वादळी वाऱ्यांची सर्वांनाच भीती असते, परंतु सध्या वातावरण शांत असल्याने संस्थांनी पासेस दिल्यास अनेक मच्छीमार मासेमारीला जाण्यास तयार असल्याचे तरे यांनी सांगून वसई, उत्तन भागासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागातील अनेक ट्रॉलर्सही मासेमारीसाठी समुद्रात गेल्याने त्यांना तुम्ही कसे रोखणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन राजन मेहेर यांच्याशी संपर्क साधला असता ११ आॅगस्टला मासेमारीला जाण्याचा निर्णय हा समुदात वित्तहानी व आर्थिकहानी होऊ नये, यासाठी सर्वानुमते घेण्यात आलेला निर्णय होता, त्याचे पालन एैच्छिक आहे असे सांगितले.