जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 12:23 AM2021-05-07T00:23:09+5:302021-05-07T00:23:25+5:30
कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची भीती : बोईसरमध्ये पोलिसांना करावे लागले पाचारण
पंकज राऊत
बोईसर : लसीकरणासाठी असंख्य नागरिक प्रतीक्षेत असताना आलेल्या तूटपुंजा लसीच्या साठ्यामुळे जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. बोईसर येथील टीमामधील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रावर गुरुवारी पहाटेपासून लाभार्थ्यांची अक्षरशः झुंबड उडून सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाल्याने लसीकरण केंद्रेच आता कोरोना प्रादुर्भावाचे ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची भीती वर्तविली जात आहे.
पालघर जिल्ह्यातील अनेक भागात हीच परिस्थिती गुरुवारी होती. जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुक्यांचा समावेश असून, वसई व पालघर या दोन तालुक्यांनंतर डहाणू व वाडा तालुक्याची लोकसंख्या लक्षणीय आहे. उर्वरित तलासरी, जव्हार, मोखाडा व विक्रमगड या तालुक्यांची लोकसंख्या त्या मानाने कमी आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण व दुर्गम भागातही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात आढळलेले रुग्ण व झालेले मृत्यू पाहता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सर्वोच्च प्राधान्य न दिल्यास अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३० लाख आहे. कागदोपत्री मात्र सुमारे २० ते २२ लाख असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत असून, ४५ वर्षांवरील व्यक्तींची लोकसंख्या सुमारे ८ लाख, तर १८ ते ४५ पर्यंतची लोकसंख्या सुमारे अडीच ते तीन लाख असल्याचे सांगण्यात येते. १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण १ मे पासून सुरू केले असले तरी त्याला फारसी गती मिळालेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे सव्वादोन लाख व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले असून, राज्यातील इतर काही जिल्ह्यांच्या मानाने लसीकरणाची ही आकडेवारी समाधानकारक वाटत असली तरी या वयोगटाबरोबरच उर्वरित सर्व वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस लवकरात लवकर देणे हे मोठे आव्हान जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागासमोर आहे.
लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी
पालघर जिल्हा आरोग्य विभागाकडे पुरेसी लस, लसीकरणासाठी सुसज्ज जागेबरोबरच कर्मचाऱ्यांची मर्यादा या अडचणी आहेत. त्यामुळे विविध भागतून तर
काही दूर अंतरावरून नागरिक मोठ्या अपेक्षेने येतात. उन्हाचा त्रास सहन करतात, परंतु त्यांचा नंबर लागत नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे, तर टीमामध्ये बोईसरमधील एकमेव लसीकरण केंद्र असून, लोकसंख्येच्या मानाने जास्त प्रमाणात लसी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.