वसईकरांवर सरणावर लाकडे रचण्याची पाळी, कर्मचाºयांअभावी अंत्यविधीसाठी होते परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 05:39 AM2017-09-12T05:39:17+5:302017-09-12T05:39:52+5:30
वसई विरार महापालिकेच्या अनेक स्मशानभूमीत लाकडांची टंचाई आहे. तर कर्मचारी नसल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांनाच दूरुन लाकडे आणून सरणावर रचावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
- शशी करपे
वसई : वसई विरार महापालिकेच्या अनेक स्मशानभूमीत लाकडांची टंचाई आहे. तर कर्मचारी नसल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांनाच दूरुन लाकडे आणून सरणावर रचावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. तर याठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याचेही समोर आले आहे.
अंत्यविधीसाठी वसईकरांची परवड होत असल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. सुनिल तिवारी यांचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव एव्हरशाईन येथील स्मशानभूमीत नेले होते. त्याठिकाणी पोचल्यानंतर स्मशानात लाकडे नसल्याचे तेथील कर्मचाºयाने सांगितले. यावेळी उपस्थित असलेले मनसेचे प्रशांत खांबे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह लाकडांसाठी सोपारा पश्चिम आणि तुळींज स्मशानभूमीत धाव घेतली. तुळींज स्मशानभूमीत लाकडे उपलब्ध नसल्याचे तेथील कर्मचाºयांनी सांगितले. तर सोपारा येथील स्मशानभूमीतील लाकडे ओली असल्याचे निमित्त सांगण्यात आले, अशी माहिती खांबे यांनी दिली.
तब्बल एक तास हिंडल्यानंतर खांबे आपल्या सहकाºयांसह स्मशानभूमीत आले असता रस्त्यावर स्मशानभूमीच्या बाहेर ओली लाकडे ठेवण्यात आल्याचे त्यांना दिसले. पण, लाकडे सरणापर्यंत घेऊन जाण्यासाठी स्मशानभूमीत एकही कर्मचारी नव्हता. अखेर खांबे यांचे सहकारी तिवारी यांच्या नातेवाईकांनी दूरवर असलेली लाकडे स्मशानात नेऊन स्वत: चिता रचली. ही लाकडे ओली असल्याने पुढचा त्रास त्यांना सहन करावा लागला.
हे कमी म्हणून की काय त्या स्मशानभूमीत हातपाय धुवायलाही पाणी नव्हते. स्मशानात पाण्याची तीव्र टंचाई असते. अनेक लोक अंत्यविधीपूर्वी आणि नंतर स्नान करतात. नातेवाईक हातपाय धुतात. पण, याठिकाणी कधीच पाणी उपलब्ध नसते, असे खांबे यांनी सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी खांबे यांनी थेट आयुक्तांनाच तक्रार केली. स्मशानात लाकडे उपलब्ध होती. एव्हरशाईन स्मशानभूमीत टेम्पो आत जात नसल्याने लाकडे रस्त्याकडेला ठेवण्यात आली होती. लाकडे आतमध्ये नेण्यात येणार होती, अशी सारवा सारव आयुक्त सतीश लोखंडे यांनी तक्रारीनंतर केली. पाचूबंदर येथील स्मशानभूमीला रात्री अकरा वाजता टाळे लावून कर्मचारी गायब झाला होता. तेव्हा बालकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना मृतदेह मांडीवर ठेऊन तब्बल दोन तास ताटकळत बसावे लागल्याचे प्रकार लोकमतने यापूर्वी चव्हाट्यावर आणला होता.