वैतरणा, पारगाव पुलांना धोका!
By admin | Published: October 10, 2016 03:12 AM2016-10-10T03:12:18+5:302016-10-10T03:12:18+5:30
वैतरणा खाडीतून बेकायदेशीर रेती उत्खननामुळे वैतरणा रेल्वे पुलासह पारगाव पुलाला धोका निर्माण झाला
पालघर : वैतरणा खाडीतून बेकायदेशीर रेती उत्खननामुळे वैतरणा रेल्वे पुलासह पारगाव पुलाला
धोका निर्माण झाला आहे. सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या प्राणहाणीची पुनरावृत्ती पालघर जिल्ह्यात होऊ नये यासाठी पालघरच्या तहसीलदारांनी खाडी शेजारी राहणाऱ्या गावात जाऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण कार्य हाती घेतले आहे.
अपघाताच्या शक्यतेचा विचार करुन भविष्यात रस्ते, रेल्वे पुलाच्या सुरक्षिततेची बाब शासन स्तरावरून गांभीर्याने घेतली गेली आहे. पालघर तालुक्यातील सफाळे-वैतरणा खाडीवरील रेल्वे पूल क्र . ९२ व ९३ च्या दोन्ही बाजू कडील ६०० मीटर परिसरातून बेकायदेशीररित्या रेती उत्खनन केले जात असल्याने रेल्वे गाड्यांना होणारा धोका लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या सुचने वरून जिल्हाधिकाऱ्यांनी अशा रेती उत्खननास पूर्णत: बंदी घातली आहे.
ह्या संदर्भात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ‘आसनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्या’ नुसार मनाई आदेश काढले होते. तरीही
काही ग्रामपंचायतींच्या हद्दीतील
काही ग्रामस्थ विनापरवाना
रात्रंदिवस खाडीतून अनिधकृत पणे रेती उत्खनन करून साठवणूक, वाहतूक आणि विक्र ी करीत असल्याचे दिसून आले होते.
एका बाजूला कायद्याच्या कठोर अंमल बाजावणीची ताकीद देताना ह्या बेकायदेशीर रेती उत्खनना मुळे वैतरणा खाडीवरील, पारगाव पूल कोसळल्यास मोठ्या जीवित हानीला आपल्याला सर्वाना सामोरे जाण्याची पाळी ओढवू शकते ह्याची जाणीव तहसीलदारांनी उपस्थितांना करून दिली.
दुर्दैवाने एखादा अपघात घडल्यास आणि त्यात आपलेच नातेवाईक बळी गेल्यास आपल्या हाती पश्चातापा शिवाय काहीही उरणार नसल्याचे वास्तव रुपी चित्र समोर उभे केले. त्यामुळे महाड च्या दुर्घटनेतून आपण काही धडा घेऊन योग्य ती काळजी घेतली नाही तर भविष्यात आपल्यावर फार मोठी आपत्ती
ओढवू शकते ह्याची जाणीवही तहसीलदार सागर ह्यांनी ग्रामस्थांना करून दिली. ह्यावेळी उपस्थितांनी आपण अशी चूक करणार नसल्याचा विश्वास तहसीलदारांना दिला. (प्रतिनिधी)
तडीपारीची कारवाई करणार
ह्या बेकायदेशीर उत्खनना मुळे भारतीय रेल्वे कायदा कलम, पर्यावरण कायदा कलम, भारतीय दंड विधान संहिता कलम व मोक्का कायद्या नुसार गंभीर गुन्हे दाखल करून तडीपारी सारख्या गंभीर गुन्ह्यांची कारवाईची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार महेश सागर ह्यांनी बहाडोली, खांमलोली, दहिसर तर्फे मनोर, सोनावे, पारगाव, दारशेत उंबरपाडा ई. भागात सभा घेऊन ग्रामस्थांना दिली.