वैतरणा, सूर्या नदी धोक्याच्या पातळीवर; ठिकठिकाणी पूरस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 12:12 AM2019-07-02T00:12:38+5:302019-07-02T00:13:08+5:30
पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक असा ४१८.२० मि.मी. एवढा विक्रमी पाऊस पडला आहे.
पालघर : रविवारपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून जिल्ह्यातील नदी-नाले, डॅम दुथडी भरून वाहू लागले आहेत. वैतरणा आणि सूर्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून आसपासच्या ६० गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापक अधिकारी विवेकानंद कदम यांनी ‘लोकमत’ला दिली. तर कवडास धरणातून ३६ हजार क्यूसेक पाण्याचा नैसर्गिक विसर्ग झाला. दरम्यान, पालघर व ठाणे जिल्ह्यात ५ जुलैपर्यंत जोरदार अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
डहाणू ते वसई दरम्यानच्या सर्व स्थानकातील रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी भरल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या तसेच लोकलही रद्द करण्यात आल्या.
पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक असा ४१८.२० मि.मी. एवढा विक्रमी पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसाने पश्चिम रेल्वेची सुरत ते वसई दरम्यानची सेवा पहाटेपासूनच विस्कळीत केली. यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले असून अनेकांना कामावर जाण्यास उशीर झाला. गुजरात, डहाणू वरून मुंबईकडे जाणारी फ्लाईग राणी एक्सप्रेस (स. ८.२५ वाजता पालघर), वलसाड फास्ट पॅसेंजर (स. ७.१०), दिवा-वसई मेमो (स. ८), डहाणू-पनवेल मेमू (स. ६.०२), डहाणू-अंधेरी लोकल (५.१६), सुरत-विरार शटल (९.३१) यांच्यासह चर्चगेट वरून डहाणूकडे जाणाऱ्या चर्चगेट डहाणू (६.४८ वाजता) (७.२६ वाजता), विरार डहाणू (६.०८) आदी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने मुंबई आणि गुजरातकडे जाणाºया चाकरमानी, विद्यार्थी यांना घरी परतावे लागले. ही बंद पडलेली रेल्वे सेवा ९ वाजे दरम्यान धिम्या गतीने सुरू झाली.
अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
पालघर-मनोर रस्त्यावरील मासवण नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या मासवणकडील भागाकडे सूर्या नदीचे पाणी रस्त्यावर शिरल्याने सकाळी पालघर-मनोर रस्त्यावरची वाहतूक काही काळासाठी बंद पडली होती. तर याच रस्त्यावरील गोवाडे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या तलावात शेजारच्या डोंगरावरील पाणी घुसले. पाण्याच्या प्रचंड दाबाने या तलावाचा बांध फुटून सर्व पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे हा रस्ता पाण्याखाली जात वाहतूक विस्कळीत झाली. पालघर-बोईसर रस्त्यावरील नवपालघर कार्यालया समोरील रस्ता, उमरोळी, पंचाळी हा मार्गही पाण्याखाली गेल्याने सकाळपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. पालघर-माहीम रस्त्यावरील पाणेरी नदीचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने या मार्गातील वाहतूक बंद पडली होती. डहाणू तालुक्यातील चारोटी येथील गुलजारी नदीला पूर आल्याने पाणी पुलावरून वाहू लागल्याने या रस्त्यावरील वाहतूकही काही काळासाठी बंद होती.
अनेक भागातील घरात कार्यालयात शिरले पाणी
पालघर येथील सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारातच ढोपरभर पाणी साचले होते. न्यायालयाच्या इमारतीमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कार्यालयातील काही कागदपत्रे भिजल्याचे कळते. शहरातील पोस्ट कार्यालयातही पाणी शिरल्याने पाण्यात उभे राहत अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करावे लागत असल्याचे मुख्य पोस्ट मास्तर ए.वानखेडे यांनी सांगितले. या इमारतीच्या समोरच्या रस्त्यावरील नव्याने बनविण्यात आलेला रस्ता भराव टाकून उंच बनविल्याचा फटका बसून पावसाचे पाणी पोस्ट कार्यालयात शिरत आहे. यासोबतच सफाळे, मनोर भागातील दुकाने, मासळी मार्केटमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.
तर तलवाडा भागातील सारशी व परिसरात पावसाचा जोर जास्त असल्याने येथील काही घरात पाणी शिरले आहे.
बोर्डीत धुंडियापाडा आदिवासीपाड्यातील २० झोपड्यांत पाणी
डहाणू/बोर्डी : बोर्डी गावातील धुंडियापाडा या आदिवासीपाड्यावरील सुमारे २० झोपड्यांमध्ये पाणी शिरले. तर, रामपूर ग्रामपंचायतअंतर्गत उमतोलपाडा पुलावरून वस्तीकडे जाणारी पाइपलाइन वाहून गेली. शिवाय, रस्त्यालगतचा खचलेला भाग पूर्ववत करण्यासाठी स्थानिकांनीच मदत केली. डहाणू-बोर्डी प्रमुख राज्यमार्गावर चिखले खाडीपाडा आणि रिठीनाका येथे पुराचे पाणी भरल्याने पहाटे वाहतूक ठप्प झाली. लगतच्या दुकानासह पोलीस चौकी, बंगलो आणि फार्महाउस परिसरात पुराचे पाणी होते. तर खाडीपाडा या आदिवासीपाड्याचा संपर्क तुटला. समुद्रकिनाºयालगतच्या भागात भराव टाकल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.दरम्यान, डहाणू शहरातील रेल्वेस्थानकाकडे जाणाºया रस्त्यावर मध्यरात्री अडीचच्या सुमारास चंद्रिका हॉटेलनजीक तसेच परिसरातील दुकानांमध्ये पाणी भरले. चंद्रसागर तसेच प्रभूपाडा येथील वस्तीतील घरात पाणी होते. त्यामुळे डहाणू नगर परिषदेने केलेले दावे फोल ठरले. सोमवारी दुपारी पावसाचा जोर वाढला १२ च्या सुमारास डहाणू खाडी ते चिंचणी मार्गावर वरोरच्या पुलावर स्मशानभूमीनजीक पुराचे पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली. हीच स्थिती चिंचणी-वाणगाव येथील किलोली पुलाजवळही होती.
१२ गावांचा संपर्क तुटला
पारोळ : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. या नदीवरील मेढे तसेच पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने वसई पूर्वेकडील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. वसई पूर्व परिसरातून वाहणाºया तानसा नदीचे पात्र मंगळवारी दुथडी भरून वाहत होते. नदीवर असलेल्या मेढे व पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने भाताणे, नवसई, आडणे, भिनार, आंबीडे मेढे, वडघर, कळभोंण लेंडी, थळ्यापाडा, हत्तीपाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक वर्षांपासून या दोन पुलांची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत असताना प्रशासन या बाबीकडे मात्र दुर्लक्ष करत आहे. तानसा नदीच्या पात्राने अद्यापही धोकादायक पातळी सोडली नसल्याने नदीकिनारी तसेच ज्या सखल भागांत पाणी साचले आहे, तेथे न जाण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
झरी खाडीपूल पाण्याखाली
तलासरी : रात्रभर मुसळधार पडणाºया पावसामुळे तलासरी-उंबरगाव यांना जोडणारा झरी खाडी येथील पूल पाण्याखाली गेला असून सुमारे चार तास वाहतूक ठप्प झाली. तालुक्यात सकाळपासून मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी पूल, मोरी, नाले पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर तलासरी बाजरपेठ, केकेनगर येथे गुडघ्याएवढे पाणी भरल्याने नागरिकांची गौरसोय झाली. तालुक्यातील तलासरी-उंबरगाव यांना जोडणारा झरी खाडी येथील कमी उंचीचा पूल वारंवार पाण्याखाली जात असल्याने वेवजी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांचे आणि उंबरगाव येथील औद्योगिक वसाहतीत जाणाºया कामगारांचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षी तीन दिवस पूल पाण्याखाली गेला होता.
कवडास धरण ओव्हर फ्लो; सूर्या नदीला पूर
कासा : दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यातील कासा जवळील कवडास धरण ओसंडून वाहत आहे. त्यामुळे सूर्या नदीला पूर आला आहे. नदी नाले भरून वाहत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कवडास धरणातील पाण्याची पातळी ६६.९० मीटर असून धरण क्षेत्रात सोमवारी २७६ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर आतापर्यंत एकूण ६०३ मि.मी. पाऊस झाला आहे. कवडास धरण ओव्हर फ्लो झाल्याने धरणातून सूर्या नदीत ३६,०८६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
यामुळे नदीकाठच्या गावातील शेतीत पाणी गेले आहे. सततच्या पावसामुळे परिसरातील लहान मोठ्या नाल्यांत पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कासा भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. तर सकाळी नोकरी निमित्ताने बाहेर पडलेल्या चाकरमान्याना वाहन नसल्याने हाल झाले. कासा भागात सर्वत्र पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली.
तारापूरला अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत
बोईसर - पालघर व बोईसर-चिल्हार रस्त्यावरील वाहतूक सकाळी झाली होती ठप्प
बोईसर : दीर्घ विश्रांतीनंतर पालघर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. बोईसरसह तारापूरला आणि एमआयडीसीमध्ये ठिकठिकाणी सर्वत्र पाणीचपाणी साचले होते. तर, बोईसर-पालघर व बोईसर-चिल्हार रस्त्यावरील वाहतूक सकाळी ठप्प झाली होती. गेल्या २४ तासांत बोईसर मंडळ क्षेत्रात सोमवारी सकाळी ३०८.०० मि.मी., तर तारापूर मंडळ क्षेत्रात ३०७.०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सकाळी थोडी विश्रांती घेतल्यानंतर दुपारी पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. तो संध्याकाळपर्यंत सतत सुरू होता. इमारतीसह संकुलात मोठ्या प्रमाणात पाणीबोईसर-तारापूर भागात दमदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी नाले तुडुंब भरून जोरात वाहत होते. तर, काही नाले तसेच गटारे प्लास्टिक व थर्माकोल आणि केरकचºयाने चोकअप झाली. यामुळे काही इमारतींसह संकुलात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसाचा जोर पाहता काही शाळांना सुटी देण्यात आली. वीजपुरवठा सुरळीत एवढ्या पावसातही वीजपुरवठा सुरळीत सुरू होता. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडून बाहेर न पडता घरातच राहणे पसंत केले होते. रेल्वेरूळ आणि स्थानकावर पाणी याठिकाणच्या रेल्वेलाइन व स्थानकावर पाणी साचल्याने काही लांब पल्ल्यांच्या गाड्या व लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. तर, काही विलंबाने धावत होत्या. रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने एमआयडीसीच्या कारखान्यांमध्ये रेल्वेने येणारे कर्मचारी तसेच अधिकारी येऊ शकले नाहीत. भिंत खचून कोसळून पडली जोरदार पावसामुळे पालघर तालुक्यातील निहे गावातील रहिवासी गीता गणेश पाटील यांच्या राहत्या घराची भिंत खचून कोसळून पडली. या घटनेत जीवितहानी झाली नाही.
वसईत तालुक्यात रात्रभर पावसाची संततधार