श्रमदानातून बांधला वनराई बंधारा; पाण्याची केली साेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 11:55 PM2020-12-04T23:55:50+5:302020-12-04T23:55:55+5:30
बंधारा बांधताना खाली सिमेंटच्या गोण्यांत खडी भरून त्या गोण्या एकावर एक रचून बांध तयार केला आहे.
जव्हार : तिलोंडा ग्रामपंचायत हद्दीतील बांबरेपाडा येथील रांजना नदीवर तारा आदिवासी सामाजिक संस्था, स्थानिक तरुण आणि विद्यार्थी यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.
हा अतिदुर्गम आदिवासी व घनदाट जंगल, डोंगरदऱ्यांनी वेढलेला तालुका आहे. या भागात पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडत असतो. मात्र, पाणी साठवणुकीची व्यवस्था नसल्याने पाणी वाहून जाते. परिणामी, उन्हाळ्यात स्थानिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या बंधाऱ्यांचा उपयोग शेतीसाठी, जनावरांना पाणी पिण्यासाठी, कपडे धुणे आदींसाठी व्हावा तसेच पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी यासाठी वनराई बंधारे बांधून पाणी अडविण्याचा प्रयत्न येथील तरुणांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू केला आहे.
बंधारा बांधताना खाली सिमेंटच्या गोण्यांत खडी भरून त्या गोण्या एकावर एक रचून बांध तयार केला आहे. यासाठी प्रशांत कामडी, कैलास भोये, सूरज गांगोडा, पंकज चौधरी, आनंद भोये, भावेश साठे, हेमंत हिरकुडा आदी तरुण आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा बंधारा बांधण्यात आला.
उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी छोट्या-मोठ्या बंधाऱ्यांसह वनराई बंधारे उपयुक्त ठरतील. या संकल्पनेतून रांजना ओहळ येथे वनराई बंधारा तयार केला आहे. - मोहन हिरकुडा, माजी सरपंच, तिलोंडा ग्रामपंचायत