वर्षभरात १०० दिवसांची मजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:22 AM2017-07-29T01:22:34+5:302017-07-29T01:22:40+5:30
जिल्ह्यात वनहक्क दाव्यांतर्गत जमिनी वाटप केलेल्या लाभार्थ्यांना त्यातून उत्पन्न मिळावे यादृष्टीने योजना राबविण्यात येणार आहेत
पालघर : जिल्ह्यात वनहक्क दाव्यांतर्गत जमिनी वाटप केलेल्या लाभार्थ्यांना त्यातून उत्पन्न मिळावे यादृष्टीने योजना राबविण्यात येणार आहेत. या वनहक्क जमिनीमध्ये उत्पन्न मिळवून देणाºया वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी लागणारी रोपे प्रशासनातर्फे मोफत दिली जाणार आहेत. त्याची जोपासना करण्यासाठी लाभार्थ्यांना वर्षाकाठी १०० दिवसांची मजुरीही देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
या वृक्ष संगोपनातून आलेले उत्पन्न त्यांच्या संवर्धक कुटुंबांना वाटून देण्यात येणार आहे. यामुळे त्यांना उत्पनाचे नवे साधन लाभेल. याचबरोबरीने हे दावे दिल्यानंतर त्यात असलेल्या झाडाच्या नोंदी ठेऊन त्यामार्फत वनसंवर्धनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कातकरी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने प्रशासनाने कातकरी समाज उत्थान अभियान घेण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील कातकरी पाड्यांचे १०० टक्के सर्वेक्षण करून शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी प्रयत्न होणार आहेत. कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांना प्रथम जात प्रमाणपत्राची आवश्यकता लागते. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना जात प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. त्यासाठी शाळेपासून ते ग्रामसेवकांपर्यंत सर्वांना प्रशिक्षण देऊन ही प्रमाणपत्रे लवकरच दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कातकरी समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना शासनातर्फे राबविल्या जातात त्या त्यांच्यापर्यंत मिळून देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. या योजना राबविल्यानंतर त्याचा लेखाजोखा सादर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
१ आॅगस्ट रोजी जिल्हा निर्मितीस ३ वर्षे पूर्ण होण्याच्या निमीत्ताने १ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट अशी पंधरा दिवसासाठी सुवर्णदिप राजस्व अभियान हाती घेणार असून महसूल विभागामार्फत याअंतर्गत वनजमिनी वाटप, वृक्षलागवड, कर्जमाफीसाठी विविध शिबिरे, कातकरी समाज जात प्रमाणपत्र वाटप आदी योजना राबविणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.