चर्चेवेळी उमेदवारांवर विविध प्रश्नांचा भडीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 12:50 AM2019-10-19T00:50:02+5:302019-10-19T00:50:33+5:30
व्यासपीठावर आरोप-प्रत्यारोप : उमेदवारांनी मांडला लेखाजोखा
वसई : वसईच्या मतदारांना विविध पक्षांची राज्यासाठीची धोरणे समजावी, या उद्देशाने वसईतील न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी महासंघ, जागरु क नागरिक संघटना आणि प्रा. स. गो वर्टी मेमोरिअल ट्रस्ट यांच्यातर्फे ‘विधानसभेसाठी आम्हीच का? ’ या कार्यक्र माचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंचावर बविआचे अध्यक्ष तथा वसई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. हितेंद्र ठाकूर, मनसेचे उमेदवार प्रफुल्ल ठाकूर उपस्थित होते. तर, महायुतीचे उमेदवार विजय पाटील अनुपिस्थत असल्याने त्यांच्यातर्फे मिलिंद खानोलकर यांनी आपली भूमिका मांडली.
महाराष्ट्र नवानर्माण सेनेचे प्रफुल्ल ठाकूर यांनी पाणीप्रश्न, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामे, मोकळ्या सरकारी जागा, वीजव्यवस्थापन, शिक्षणाच्या सुविधा, परिवहन सेवा, पर्यावरण, आरोग्य सुविधा इत्यादी मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. तर मुसळधार पाऊस पूर्वीही यायचा, परंतु तेव्हा वसई बुडत नव्हती. आता दोन तास जरी पावसाचा शिडकावा झाला तरी अवघी वसई पाण्याखाली जाते. हे कोणाचे अपयश आहे, अशी विचारणा मनसेने केली आहे.
तर सेना-भाजप महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांचे प्रतिनिधी मिलिंद खानोलकर यांनी यावेळी महापालिकेची परिवहन सेवा कंत्राटदाराच्या सोयीसाठी चालविण्यात येत असल्याचे सांगितले. तर महापालिकेने घरपट्टी आकारताना कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. अशाचप्रकारे ६९ गावांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. याशिवाय वसईत सुसज्ज असे शासकीय रुग्णालय नाही. समुद्रकिनाऱ्यांवर पुरेसे धूपप्रतिबंधक बंधारे नाहीत. परिणामी मच्छीमार आणि बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे, अशा अनेक समस्यांना त्यांनी हात घातला.
नको त्या गोष्टींचा विरोधक बागुलबुवा करतात
या सगळ्या आक्षेपांना आ. हितेंद्र ठाकूर यांनी रोखठोक उत्तर दिले. वसई - विरारमध्ये कोणतीही समस्या असली की त्यामागे आपलेच नाव घेतले जाते. या भागातून विधानपरिषद, शिक्षक, पदवीधर आदी माध्यमांतून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींना अजिबात जाब विचारला जात नाही. मात्र, ही टीका मी सकारात्मकरित्या घेतो. हे मी माझे यश समजतो. आपण शहराच्या विकासावर मते मागत आहोत आणि विरोधकांकडे एकही मुद्दाच नसल्यामुळे ते नको त्या गोष्टींचा बागुलबुवा उभा करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असे त्यांनी सांगितले.