वसई आगाराचा भोंगळ कारभार, प्रवाशांना ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 12:41 AM2019-08-11T00:41:40+5:302019-08-11T00:42:19+5:30
कामाचे योग्य नियोजन आणि त्यात हवा तसा समन्वय नसल्याने वसई-नवघर बस आगाराच्या भोंगळ कारभाराने सामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत.
पारोळ : कामाचे योग्य नियोजन आणि त्यात हवा तसा समन्वय नसल्याने वसई-नवघर बस आगाराच्या भोंगळ कारभाराने सामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. वसई आगारातून लांब पल्ल्यासाठी सोडण्यात येणाऱ्या बस प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांना मनस्ताप भोगावा लागत आहे. प्रवासी घटल्याची आवई उठवणाºया वसई आगाराच्या कामातच सातत्य नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
वसई पूर्व ग्रामीण भाग हा दुर्गम आहे. जंगलाच्या दिशेने राहणाºया व कामासाठी शहरात येणाºया प्रवाशांना एसटी फायदेशीर आहे. मात्र याच लांबपल्ल्याच्या बस प्रवाशांच्या भावनांशी देणेघेणे न ठेवता अचानक रद्द केल्या जात असल्याने सामान्य प्रवाशांना कपाळाला हात लावण्याशिवाय पर्याय उरत नाही. वसई-नवघर आगारातील कर्मचारी यापुढे सुधारतील अशी आशा असून तसे झाले नाही तर त्यांना प्रवाशांच्या संतापाचा सामना करावा लागेल, अशा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
वसई व नवघर हे दोन आगार एकमेकांना संलग्न आहेत. वसई आगारातूनच वाहक-चालकांच्या ड्युटी निश्चित केल्या जातात. आता नवघर आगारातून सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास वसईपासून सुमारे ५० ते ५५ किलोमीटर लांब असलेल्या पालसई गावाकरिता नाईट शिफ्टसाठी सोडली जाणारी पालसई ही बस आहे. या बसचा फायदा जंगलाच्या दिशेने एकही प्रवासी वाहन जाऊ शकत नाही अशा नांदणी, अंबरभुई, पालसई व परिसरातील काही आदिवासी गावपाड्यांना होतो. भाजीपाला विकण्यासाठी आदिवासी महिला वसई शहरात येतात. पालसई बस एक दिवसाआड रद्द केली जात असल्याने पर्यायी वाहनांचा अवलंब करत घर गाठावे लागते. ही बस रद्द झाल्याने बसने २ तासांचा प्रवास असतो तो ३ ते ४ तासांवर जातो. नवघर आगारातून सुटणाºया आवंढे, घोडमाळ या लांब पल्ल्याच्या बसचीही वरीलप्रमाणेच अवस्था आहे. त्याही कधीकधी अचानक रद्द केल्या जातात.
वज्रेश्वरी बस कायमस्वरुपी बंद
नवघर आगारातून पूर्वी साडेआठ वाजता सोडली जाणारी वज्रेश्वरी बस आगार व्यवस्थापकांनी कायमस्वरूपी बंद केली आहे. प्रवासी नाहीत असे कारण देत ही बससेवा बंद केली. परंतु आगाराचे हे उत्तर साफ खोटे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. वज्रेश्वरी हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी जाणाºया भाविकांची तसेच या ठिकाणाहून वसई-मुंबईच्या दिशेने रोज प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे. साडेआठची बस रद्द केल्याने आगारातून सायंकाळी ६.१० वाजता सुटणारी पालसई, संध्याकाळी ६.३५ वाजता सुटणारी खंबाळा आणि रात्री ७.३५ वाजता सुटणाºया चांबळा बसवर मोठा ताण येतो. कधीकधी यापैकी एखादी बस रद्द केली तर प्रवाशांची मोठी गैरसोय होते.
आगार व्यवस्थापकांनी वेळीच आपले वर्तन सुधारावे अन्यथा त्यांना प्रवाशांच्या संतापाला सामोरे जावे लागेल व लांब पल्ल्याच्या बस रद्द न करता त्या पुन्हा कायमस्वरूपी सुरळीत करण्यात याव्यात. - संदेश भोईर, प्रवाशी
प्रसंगी पायी जाण्याची येते वेळ
रात्री ८.०० आणि ८.२० वाजता सुटणाºया करंजोण आणि कळंभोण या बस तर कोणतीही अडचण नसताना अचानक रद्द केल्या जातात. मागील आठवडाभरापासून या दोनपैकी एक बस रद्दच केली आहे. करंजोण आणि कळंभोण या दोन्ही गावात रात्री ८ नंतर प्रवासी वाहने जायची बंद होतात. त्यामुळे वाहन नसल्याने भाजीपाला विकण्यासाठी येणाºया आदिवासी महिला, औद्योगिक वसाहतीत कामासाठी येणाºया प्रवाशांना पायी धोकादायक प्रवास करावा लागतो.