वसईमध्ये २ हजार २४५ गौराईंचे आगमन : माहेरवाशिणीला मटण आणि चिंबोरीचा नैवेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:12 AM2017-08-30T01:12:27+5:302017-08-30T01:12:55+5:30

वसई तालुक्यात गौराईचे मंगळवार दुपारपासूनच पावसाच्या हजेरीत उत्साहाने स्वागत झाले. वसईतील अनेक भागात गौराईच्या मूर्ती वाजत-गाजत नाचत घरोघरी आणण्यात आल्या.

In Vasai, the arrival of 2 thousand 245 Guarai: mother and mother of chembri | वसईमध्ये २ हजार २४५ गौराईंचे आगमन : माहेरवाशिणीला मटण आणि चिंबोरीचा नैवेद्य

वसईमध्ये २ हजार २४५ गौराईंचे आगमन : माहेरवाशिणीला मटण आणि चिंबोरीचा नैवेद्य

Next

वसई : वसई तालुक्यात गौराईचे मंगळवार दुपारपासूनच पावसाच्या हजेरीत उत्साहाने स्वागत झाले. वसईतील अनेक भागात गौराईच्या मूर्ती वाजत-गाजत नाचत घरोघरी आणण्यात आल्या. यंदा तालुक्यात २ हजार २४५ गौराईंचे आगमन झाले आहे.
वसई तालुक्यात आगरी, कोळी समाजात गौराईचा सण उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी गौराईची मूर्ती नाचत, वाजत गाजत मिरवणुकीने आणली जाते. ही परंपरा यंदाही मुसळधार पाऊस कोसळत असतानाही कायम होती.
वसईत तालुक्यात यंदा २ हजार २४५ गौराई आल्या आहेत. त्यात ४२ सार्वजनिक तर २ हजार २०३ घरगुती गौराईंचा समावेश आहे. वसई तालुक्यातील कामण, पोमण, चंद्रपाडा, ससूनवघर, मालजीपाडा. जुचंद्र, टिवरी राजावली, दिवाणमान, चुळणे या आगरी बहुसंख्य असलेल्या गावांमध्ये गौराईंचा सण उत्साहाने साजरा केला जातो. त्याचबरोबर किनारपट्टींवरील कोळी समाजाच्या घरी गौराईचे धुमधडाक्यात आगमन होते. अनेक घरांमध्ये गौराईंच्या मूर्तींची आज स्थापना झाली. गौराईच्या पूजेसाठी गेल्या दोन दिवसांपासूनच वसईतील बाजारपेठा गजबजल्या होत्या. गौराईची मूर्ती आणि पूजेच्या साहित्याला यंदा महागाईची झळ बसली होती. त्यानंतरही भाविकांनी गौराईच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती.


गौरीचे प्रतिकात्मक पूजन तेरड्याच्या रोपट्याने
डहाणू : गौरी म्हणून तेरड्याच्या रोपट्याची प्रतिकात्मक पुजा करण्याची प्रथा आजही येथे कायम आहे. या पारंपरिक पूजनाला स्थानिकांकडून मोसमी फळाफुलांचा वापर केला जातो. त्यामुळे ही जमवाजमव करण्यासाठी या सणाच्या दिवशी सुवाशिंनींची लगबग दिसून आली. गौरीच्या निमित्ताने घरच्या माहेरवाशिनी घरोघरी आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
मागील काही वर्षांपासून तालुक्यातील शहरी भागात गौरीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याकडे कल वाढत आहे. मात्र खेडोपाडी तेरड्याच्या रोपट्याचीच प्रतिकात्मक पुजन करण्याची प्रथा आहे. या करिता माळरानावर उगवलेली रोपटी गौरी आगमनाच्या दिवशी न आणता पूजनाच्या दिवशी आणली जातात. शिवाय पूजन तसेच सजावटीकरिता विविध रानफुले आणण्यासाठी लहान मुली आणि सुवाशिणी शोधाशोधकरीत फिरताना दिसतात.
सायंकाळी या प्रतिकात्मक गौरीचे दारात औक्षण करण्यात आले. काठपदरी साडी आणि विविध दागिन्यांनी सजावट करण्यात आली होती. त्यानंतर कणकेत कुंकू किंवा हळद मिक्स करून घट्ट द्रावण करुन हाताच्या मुठी बुडवून पावलांप्रमाणे ठसे उमटवून संपूर्ण घरभर गौरीचा संचार घरोघरी पहावयास मिळाला. त्यामागे घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे.
देवघरात गौरीचे विधिवतपूजन केल्यानंतर आरती, नैवेद्य अर्पण केला जातो. विविध स्थानिक भाज्यांचा वापर नैवेद्यासाठी केला जातो. मात्र, काही ठिकाणी मटण आणि माशांचा नैवेद्यही दिला जातो.
रात्रभर जागरण करून ग्रामीण ढंगाची पारंपरिक गाणी गायली जायची, मात्र हल्ली हिंदी-मराठी चित्रपट गाण्यांची भर पडली आहे. या काळात महिला एकमेकींच्या घरी दर्शनासाठी जाऊन परस्परातील नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी माहेरवाशिणी घरी येत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

Web Title: In Vasai, the arrival of 2 thousand 245 Guarai: mother and mother of chembri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.