वसई-भार्इंदर जेट्टीच्या कामाला खाडीत प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 05:54 AM2019-01-06T05:54:39+5:302019-01-06T05:55:21+5:30

रो-रो सेवा : वर्षानंतर जलवाहतूक होणार सुरू, मेरीटाईम बोर्डाचा पुढाकार

Vasai-Bharindar Jetty's work begins in the bay | वसई-भार्इंदर जेट्टीच्या कामाला खाडीत प्रारंभ

वसई-भार्इंदर जेट्टीच्या कामाला खाडीत प्रारंभ

Next

भार्इंदर : भार्इंदर पश्चिम ते वसईदरम्यान रो-रो जलवाहतुकीसाठी दोन्ही खाडीकिनारी नवीन जेट्टीच्या कामाला मेरीटाइम बोर्डाने नुकतीच सुरुवात केली आहे. हे काम एका वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मेरीटाइम बोर्डाच्या सूत्रांनी दिली. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी झालेल्या एका कार्यक्रमात शहरात रो-रो सेवा सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार, या सेवांतर्गत भार्इंदर पश्चिमेकडील खाडी ते वसई येथे येजा करण्यासाठी जेट्टीच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.

भार्इंदर येथून वसईला जाण्यासाठी सध्या रेल्वे व रस्ता वाहतुकीचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहे. रेल्वेने वसई येथे जाण्यासाठी किमान २० ते २५ मिनिटे, तर रस्ते वाहतूकमार्गे जाण्यासाठी किमान एक तासाचा प्रवास करावा लागतो. दोन्ही शहरे खाडी व समुद्रकिनाऱ्याला लागून असल्याने तेथील प्रवाशांना जलमार्गाद्वारे जलद व माफक दरातील वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गडकरी यांनी या शहरांचा रो-रो सेवेत समावेश केला. जेट्टीच्या कामासाठी १५ कोटींचा खर्च येणार आहे. जेट्टी पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. एका मोठ्या बोटीद्वारे प्रवाशांना आपल्या दुचाकीसह चारचाकी नेता येणार आहे. यामुळे इंधन व वेळेची मोठी बचत होणार असून दोन्ही शहरांतील प्रवासाचा कालावधी तासाभराने कमी होणार आहे. तिकिटाचा दर अद्याप निश्चित केलेला नसून ती सरकारी यंत्रणेमार्फत चालवली जाणार की कंत्राटदाराकडून, याचा निर्णय झालेला नाही. वसई येथील जेट्टी किल्ल्याजवळ असलेल्या जुन्या जेट्टीजवळ बांधण्यात येत आहे. भार्इंदर येथून जेट्टीकडे येजा करण्यासाठी तूर्तास रस्त्याची सोय झालेली नाही.

वाहतूककोंडी होईल?
सध्या भार्इंदर स्थानक ते खाडीदरम्यान एकमेव रस्ता असून तो अरुंद आहे. त्याच्याशेजारी पश्चिम रेल्वे प्रशासनाची जागा आहे. खाडीकिनारी तिवर क्षेत्र असल्याने वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे वाहतूक
कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Vasai-Bharindar Jetty's work begins in the bay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.