वसई- विरार महापालिका ‘एच’ प्रभागाबाहेर भाजपाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:44 PM2019-06-15T23:44:19+5:302019-06-15T23:44:44+5:30

मनमानी कारभार बंद करा, अन्यथा खुर्चीवर बसू देणार नाही...

Vasai-BJP's movement outside Virar municipality 'H' division | वसई- विरार महापालिका ‘एच’ प्रभागाबाहेर भाजपाचे आंदोलन

वसई- विरार महापालिका ‘एच’ प्रभागाबाहेर भाजपाचे आंदोलन

Next

वसई : वसई रोड भाजपातर्फे आपल्या प्रलंबित व विविध मागण्यांकरीता वसई-विरार महापालिका अंतर्गत ‘एच’ प्रभाग समिती नवघर माणिकपूर कार्यालया समोर शुक्र वारी सकाळी ११ ते ५ या दरम्यान आंदोलन छेडण्यात आले. याप्रसंगी महापालिका प्रशासनाच्या भोंगळ व मनमानी कारभाराविषयी नाराजी व्यक्त करीत भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हल्लाबोल चढवला.

या धरणे व हल्लाबोल आंदोलनाचे नेतृत्त्व भाजपाचे वसई रोड शहर अध्यक्ष उत्तमकुमार यांनी केले. दरम्यान प्रभाग समिती ‘एच’मध्ये वसई रोड स्टेशन व आजूबाजूच्या परिसरात फेरीवाल्यांचा पडलेला विळखा, वाहनांमुळे होणारी वाहतुक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग, औषध फवारणी नाही, धूर फवारणी नाही, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, वाढती अनधिकृत बांधकामे, बेकायदेशीर होर्डिंग्ज त्याचबरोबर अर्धवट राहिलेली नालेसफाई यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. एकूणच या सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकारण व्हावा यासाठी मागील तीन महिन्यापासून वसई रोड शहर भाजपामार्फत पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, प्रभाग समिती ‘एच’चे सहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्सालविस यांनी यातील कुठलीही समस्या पूर्णपणे सोडविली नाही, असा उत्तम कुमार यांचा आरोप होता.

यामध्ये खास करून ओमनगर येथील तरण तलावात मृत्यू झालेल्या मुलाच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, ही देखील मागणी उत्तमकुमार यांनी महापालिकेकडे केली आहे. परिणामी आपल्या लोकहिताच्या मागण्या मान्य न झाल्यामुळेच आपण या प्रभाग समिती कार्यालया बाहेर धरणे आंदोलन करीत हल्लाबोल चढवला असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. तर यावेळी जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. त्याचबरोबर येत्या १५ दिवसात वसई रोड परिसरातील समस्या निकाली न निघाल्यास प्र. सहा. आयुक्त गिल्सन घोन्सालविस यांना खुर्चीवर बसू देणार नाही, असा इशाराही याप्रसंगी उत्तमकुमार यांनी दिला आहे. यावेळी आंदोलकांनी घोन्सालवीस यांना निवेदन दिले.

या आंदोलन प्रसंगी भाजप प्रदेश प्रतिनिधी शेखर धुरी, ज्येष्ठ नेते दत्ता नर, जिल्हा सरचिटणीस राजन नाईक, शहर अध्यक्ष उत्तम कुमार नायर, महिला मोर्चाच्या कांचन झा आदी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

महापालिकेने नाकारली परवानगी
‘या धरणे आंदोलनाला महापालिकेने परवानगी नाकारल्याने कार्यकर्र्त्यांंमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे उभे राहून महापालिकेविरोधात निदर्शने केली. लोकशाही मार्गाने आंदोलने, निदर्शने, उपोषण करण्याच्या मूलभूत अधिकारावर महापालिका वाहतूक कोंडीच्या नावाखाली गदा आणत आहे.’
- उत्तम कुमार, भाजपा वसई शहर अध्यक्ष

गुरुवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी आंदोलनकर्ते उत्तम कुमार व त्यांच्या पदाधिकारी सोबत चर्चा केली, त्यांना आश्वासन दिले. त्याचसोबत १२२ कोटींचा घोटाळा, नालेसफाई, बेकायदेशीर बांधकामे आदी बाबी मुख्यालय संबंधित आहेत. प्रभागस्तरावरील विषय आम्ही हाताळू.
- गिल्सन घोनसालवीस, सहाय्यक आयुक्त, नवघर माणिकपूर, एच प्रभाग समिती

Web Title: Vasai-BJP's movement outside Virar municipality 'H' division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.