वसई ते चर्चगेट महिला विशेष लोकलचा विरारपर्यंत विस्तार नको
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 11:41 PM2018-10-16T23:41:10+5:302018-10-16T23:41:40+5:30
प्रवाशांच्या मागणीला भाजप नेत्या शायना एन सी यांचा पाठिंबा; येत्या 7 दिवसात योग्य निर्णय घेऊ - महाव्यवस्थापक गुप्ता यांचे आश्वासन
मुंबई : पश्चिम रेल्वेने १ नोव्हेंबर पासून नवीन वेळापत्रकात वसई-चर्चगेट महिला विशेष लोकलचा विस्तार विरारपर्यंत करण्याची घोषणा केली. मात्र, विरार येथून महिला विशेष लोकल सुरू केल्यास अन्य लोकल प्रमाणे ही लोकल सुद्धा गर्दीने भरून येईल, या भीतीमुळे विरारपर्यंत विस्तार करण्याच्या निर्णयाला महिला प्रवाशांनी विरोध केला आहे. या मागणीसह महिला प्रवाशांच्या समस्यां तातडीने सोडवण्यासाठी भाजप नेत्या शायना एन सी यांनी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता यांची भेट घेतली. भेटीत महाव्यवस्थापक गुप्ता यांनी येत्या 7 दिवसात या प्रकरणी योग्य ते उपाय करण्यात येतील असे आश्वासन दिल्याची माहिती शायना एन सी यांनी दिली.
पश्चिम रेल्वेवर सध्या 9 वाजून 56 मिनिटांनी वसई रोड ते चर्चगेट ही महिला विशेष लोकल सुरू आहे. मिरारोड आणि दहिसर येथील प्रवाशांना लोकल मध्ये प्रवेश केल्यानंतर वांद्रे किंवा दादरपर्यंत सीट मिळत नाही. तर नायगाव स्थानकातून प्रवास सुरु करणाऱ्या महिलांना देखील अंधेरी किंबहुना वांद्रे स्थानकापर्यंत बसण्यास जागा मिळत नाही. किमान या लोकलमध्ये प्रवेश करण्यास मिळत असल्यामुळे महिला प्रवाशांसाठी ही लोकल सोईची ठरत असल्याने वसई ते चर्चगेट महिला विशेष लोकलचा विरार स्थानकापर्यंत विस्तार न करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
9 वाजून 6 मिनिटांची भाईंदर-चर्चगेट आणि 9 वाजून 56 मिनिटांनी वसई रोड-चर्चगेट या महिला विशेष लोकलच्या दरम्यान भाईंदर ते दादर किंवा चर्चगेट लोकल चालवण्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रथम दर्जा बोगीमध्ये द्वितीय दर्जा पास किंवा तिकीट धारक महिला मोठ्या संख्येने प्रवास करतात, यांना आळा घालण्यासाठी देखील पश्चिम रेल्वे प्रशासनाने पावले उचलावी, लोकलमध्ये द्वितीय दर्जाच्या महिला विशेष बोगीची संख्या वाढवावी, सकाळी गर्दीच्या वेळेत धावणाऱ्या काही लोकल फेऱ्यांना मीरा रोड स्थानकात थांबा दिल्यास महिला विशेष लोकलमधील गर्दी कमी होईल. त्याच बरोबर वसई रोड आणि विरार येथून चर्चगेट करिता सुटणाऱ्या काही जलद लोकल फेऱ्यांचा बोरीवली स्थानकातील थांबा रद्द करा, अशी सूचना ही यावेळी करण्यात आली. महिला प्रवाशांच्या अडचणी आणि समस्यांबाबत येत्या 7 दिवसात सर्वेक्षण करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महाव्यवस्थापक गुप्ता यांनी दिल्याचे शायना एन सी यांनी सांगितले.