खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 16:09 IST2025-04-20T16:09:50+5:302025-04-20T16:09:50+5:30
Vasai Boy Kills Sister: वसईतील नालासोपारा येथे खेळण्यावरून वाद झाल्याने एका १३ वर्षाच्या मुलाने धाकट्या बहिणीची हत्या केली.

खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
पालघर जिल्ह्याच्या वसईत एका १३ वर्षाच्या मुलाने सात वर्षीय बहिणीची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. या घटनेतील भाऊ- बहिणींमध्ये खेळण्यावरून वाद झाला. त्यानंतर मुलाने धारदार कटरने बहिणीचा गळा चिरला. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या घटनेमुळे मुलांना एकटे घरी सोडून कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या पालकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन परिसरात मिथुन शर्मा हे त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. दरम्यान, गुरुवारी दुपारी शर्मा दाम्पत्य नेहमीप्रमाणे कामावर गेले असताना त्यांचा थोरला मुलगा आणि धाकटी मुलगी यांच्यात खेळण्यावरून वाद झाला. त्यानंतर मुलाने रागाच्या भरात त्याच्या बहिणीच्या गळ्यावर कटरने वार केला. या घटनेत तिच्या गळ्यात गंभीर दुखापत झाल्याने ती जमीनीवर कोसळली. यामुळे घाबरलेल्या मुलाने लहान बहीण स्टूलवरून खाली पडल्याचे सांगितले. मदतीसाठी धावून आलेली शेजारी मुलीची अवस्था पाहून हादरले.
मुलीसोबत नेमके काय घडले? याबाबत कुणालाही माहिती नव्हती. मात्र, मुलीच्या गळ्यावर वार झाल्याच्या खुना पाहून पोलिसांना संशय आला. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता भावानेच बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडील कामाला गेलेले असताना भाऊ- बहिणींमध्ये खेळण्यावरून वाद झाला. त्यानंतर भावाने बहिणीच्या गळ्यावर कटरने वार केले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाला ताब्यात घेण्यात आले. एका भावानेच बहिणीची अशाप्रकारे हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.