वसई, विरारमधील नाले सफाई ३० पर्यंत होईल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:26 AM2019-05-14T00:26:06+5:302019-05-14T00:26:18+5:30
पालिकेने ३० मे ला नाले सफाईचे काम पूर्ण होण्याची शाश्वती दिली असली तरीही छोट्या नाल्यांची सफाई अद्यापही झालेली नसून त्यातील गाळ व कचरा तसाच आहे.
विरार : पालिकेने ३० मे ला नाले सफाईचे काम पूर्ण होण्याची शाश्वती दिली असली तरीही छोट्या नाल्यांची सफाई अद्यापही झालेली नसून त्यातील गाळ व कचरा तसाच आहे. तसेच मोठया नाल्यांची सफाई योग्यरित्या होत नसल्यामुळे महापालिकेची नाले सफाई कधी किती व कशी पूर्ण होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळा आला की वसई तालुक्यातील नागरिकांना पाणी भरण्याची चिंता सतावत असते. गेल्यावर्षी सर्व प्रयत्न केल्यानंतर व १०० टक्के नाले सफाई झाली असल्याचा दावा करूनही नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला होता तर यावर्षी ते होऊ नये यासाठी पालिकेने जमेल तितके प्रयत्न सुरु केले आहेत. असा दावा महापालिकेकडून होत आहे. पूरस्थिती निर्माण होण्याचे सर्वात मोठे कारण हे नाले सफाई न होणे हे असल्याने मार्चमध्ये नाले सफाईला सुरवात झाली असून आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे असे महापालिकेचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी पालिकेने ४.५ करोड नाले सफाई वर खर्च केला होता यावर्षीही तितकाच खर्च नालेसफाईकरिता करण्यात येणार आहे. तर मोठ्या मोठ्या नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे असा दावा महापालिकेचा आहे. परंतु शहरातील अनेक भागात असलेली छोटी गटारे व नाले यांची सफाई अद्यापही झालेली नाही. तसेच ज्या नाल्यांची सफाई करण्यात आली आहे त्यांचा गाळ काढून बाहेरच ठेवल्यामुळे तो पुन्हा नाल्यात पडल्याने पावसात नाले पुन्हा तुंबण्याची शक्यता वाढली आहे.
गेल्या वर्षी सर्वत्र नाले सफाई करून देखील नागरिकांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला होता तर माजी आयुक्त सतीश लोखंडे यांनी जागो जागी जाऊन स्वत: नाल्यांची पाहणी केली होती. स्वत: आॅडीट केले होते व त्यांचे फोटो काढून सफाईबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवली होती. तसेच लोकांकडूनही तक्र ार व माहिती घेण्यासाठी व्यासपीठ तयार केले होते. मात्र, यावेळी असं काहीच घडतांना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीमुळे अधिकारी व आयुक्त हे निवडणुकीच्या कामात व्यस्त होते तर आता पुन्हा मतमोजणीचे काम सुरु होणार असून अधिकारी त्यात व्यस्त असतील. त्यामुळे ठेकेदाराचे चांगलेच फावले असून नाले सफाईत हात सफाई होतांना दिसत आहे. वसई पश्चिमेकडील माणिकपूर बºहामपूर, आनंदनगर, पांचाळनगर या परिसरातील पाण्याचा निचरा ७६ ओहोळातून होतो. हा भाग रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या खालून गेला आहे. त्यामुळे तेथील सफाई झालेली नाही.
कॅल्व्हर्टची सफाई नाही
विशालनगर, शास्त्री नगर, अंबाडी रोड येथील नाल्यामधून सोपारा खाडीत पाणी जाते. याठिकाणी अडथळे येतात त्यामुळे योग्य ती सफाई होत नाही. नालासोपारा पश्चिम, गास, निर्मळ, गिरीज, सांडोर, सालोली व तत्कालीन नवघर माणिकपूर नगरपरिषदेचा भाग हा कॅल्व्हर्ट ७८ मधून जातो.
छोटया नाल्यांच्या सफाईकडे झाले आहे दुर्लक्ष
पावसाळयात माणिकपूर, स्टेशन परिसर, आनंद नगर, पूर्र्व भाग, नालासोपारा ते स्टेशन परिसर, आचोळे रोड, अलकापुरी, गालानगर, एव्हर शाइन, शिर्डी नगर, सेंट्रल पार्क, विजय नगर, ओसवाल नगरी, मोरेगांव, तुळींज रोड पश्चिम के निलेमोरे, लक्ष्मीछेडा मार्ग, पाटणकर पार्क, हनुमान नगर, श्रीप्रस्था, विरार पूर्व मनवेलपाडा, कारगिल नगर, नाना नानी पार्क, फुलपाडा, स्टेशन परिसर, पश्चिम ते एमबी इस्टेट, बोलींज, स्टेशन रोड इत्यादी ठिकाणी पाणी साचण्याची समस्या होते. याठिकाणी असलेल्या नाल्यांमध्ये अद्यापही घाण साचलेली असून त्याकडे महापालिकेचे लक्ष नाही. ते आता जाणार कधी आणि सफाई होणार कधी?