वसईत परप्रांतीय मजुरांची फुटपाथवरच पथारी; श्रमिक ट्रेन कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 01:35 AM2020-05-25T01:35:26+5:302020-05-25T06:35:05+5:30
महसूल खाते, पोलिसांची दमछाक; सनसिटी मैदानात विदारक चित्र
वसई : लॉकडाऊनमुळे राज्याच्या विविध भागांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था प्रशासन करीत आहे. एकट्या पालघर जिल्ह्यातूनच आतापर्यंत १७ हजारांहून अधिक मजुरांना गावी पाठवण्यात आलेले आहे. मात्र तरीही अद्यापही असंख्य मजूर अडकून पडलेले असून श्रमिक ट्रेन मिळण्याच्या अपेक्षेने ते कुटुंबकबिल्यासह वसई स्टेशन परिसरात जमा होत आहेत,
मात्र गाडी न मिळाल्यामुळे असंख्य मजुरांना कुटुंबीयांसह मैदानात तसेच फुटपाथवरच रात्र काढावी लागत आहे.
वसई-विरार महापालिका हद्दीत तसेच जिल्ह्याच्या विविध भागांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना आतापर्यंत परराज्यात विविध ठिकाणी श्रमिक ट्रेनने सोडण्यात आले आहे. ज्या मजुरांना टोकन देण्यात आलेले आहे, अशांनाच सध्या सोडले जात आहे,मात्र तरीही अन्य मजूरही आपापल्या कुटुंबीयांसह गावाकडे जाण्याच्या ओढीने स्टेशनवर जमा होत आहेत. ज्यांना जिल्हा प्रशासन तसेच वसई महसूल यंत्रणा यांचा संदेश आलेला नाही, त्यांनी स्टेशनवर येऊ नये, असे आवाहन करूनही हे कामगार जमा होत आहेत. महसूल प्रशासनाकडून मजुरांना प्रथम वसईच्या सनसिटी मैदानात जमा होण्यास सांगितले जाते.
ट्रेन लागली की, ज्याला संदेश आला आहे अशा मजुरांनाच ट्रेनमध्ये मास्क व सॅनिटाईज करून सुरक्षित अंतर पाळून प्रवेश दिला जातो. केवळ गावी जाण्याच्या आशेने हे मजूर इथल्या फुटपाथवर ठाण मांडून रात्रभर बसलेले असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
वसई तालुक्यात अडकलेल्या व आपल्या गावी, परराज्यात जाण्यासाठी रीतसर महसूल विभागाकडे नोंद केलेल्यांसाठी आरक्षण करून तसे संदेश पाठवले जातात.
सनसिटी भागात फुटपाथवर व रस्त्यावर जमा होऊन रात्र काढणारे शेकडोंच्या संख्येने गोळा झालेले बहुतांश कामगार हे ठाणे, मीरा रोड, भार्इंदर आदी भागातून पोलिसांच्या नजरा व नाकेबंदी चुकवून येत आहेत. तालुक्याबाहेरील कामगार-मजुरांना प्रवेश देऊ नका, अशा सूचना आम्ही पोलिसांना केल्या आहेत. तरीही येथे आलेल्या सर्व मजुरांची अन्नपाण्याची सोय स्वयंसेवी संस्था व महसूल विभाग करीत आहे.
- स्वप्निल तांगडे, वसई उपविभागीय अधिकारी